प्रतिनिधी / बेळगाव : हॉटेलमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची असल्याने विल्हेवाट लावण्याचा आदेश बजावला होता. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने कचरा विल्हेवाटीसाठी उपकरणे बसवून घ्या. अशी सूचना करण्यासाठी गुरुवारी बैठक बोलवण्यात आली. महापालिका आयुक्त, यंत्र पुरवठा करण्याऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनपाच्या सभागृहात बंद दरवाजाआड कोणती ‘डील’ झाली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा उत्पन्न होत असतो. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट संबंधित हॉटेल व्यवसायिकांनीच लावावी अशी सूचना करण्यात आली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नसल्याने आयोजित बैठकीला वृत्तपत्र माध्यमांना महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी मज्जाव केला. बैठक सुरू झाल्यानंतर बोलवण्यात येईल असे सांगून वृत्तपत्र माध्यमाच्या प्रतिनिधींना बाहेर जाण्याची सूचना केली. यामुळे हॉटेलओनर्स असोसिएशन, यंत्र पुरवठा करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि आयुक्तांमध्ये कोणती ‘डील’ झाली ? असा मुद्दा उपस्थित झाला.
वास्तविक पाहता शहरातील कचरा सर्वांची डोकेदुखी झाली आहे. पण या संबंधित असलेल्या बैठकीला माध्यम प्रतिनिधींना या बैठकीतून बाहेर काढण्याचे गोड बंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता महापालिका आयुक्तांना देखील वृत्तपत्र माध्यमाचे वावडे झाल्याचे निदर्शनास आले आहे.