हवामानाच्या खेळाने गोमंतकीय हैराण : गुरुवारी विक्रमी उष्णता 38.2 डि. से.
विशेष प्रतिनिधी / पणजी
गोव्यात काल गुरुवारी पुन्हा एकदा पारा तापला आणि दुसऱ्यांदा नवा रेकॉर्ड झाला. पणजीत तब्बल 38.2 डि. से. एवढे तापमान होते. 2009 नंतर प्रथमच गोव्यात एवढे तापमान वाढले. हवामान खात्याने पुढील तीन दिवस असेच वातावरण राहील, असा इशारा दिला आहे.
सरासरी तापमानाच्या तुलनेत पारा 5 डि. से. ने वाढलेला आहे. पणजीसह राज्यात सर्वत्र दुपारी 11.30 नंतर उन्हाची झळ प्रकर्षाने बसायला सुरुवात झाली. दु. 3.30 वा. पर्यत ही उष्णतेची लाट कायम होती. यापूर्वी 21 फेब्रुवारी 2009 रोजी गोव्यातील तापमान 38.2 डि. से. एवढे होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दि. 18 फेब्रुवारी नंतर तापमान 2 डि. से. ने खाली उतरणार आहे. पणजीसह राज्यात सर्वत्र काल उष्णतेचे चटके अनेकांना बसले. अनेक व्यापाऱ्यांनी देखील दुकाने दुपारच्या दरम्यान बंद केली.
दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे पहाटे तापमान एवढे खाली उतरले की जणू काही थंडीची लाट पसरली. 19.2 डि. से. पर्यंत पारा खाली उतरला.
उष्णतेची सर्वानाच झळ बसल्याने शहाळी, ऊसाचा रस, कलिंगडे, टरबूज, लिंबूसोडा इत्यादींची मागणीही वाढली. काजू उत्पादकांनी या बदलत्या हवामानाचा काजू उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. गोव्यातील अनेक भागात आताच कुठे आंब्यांना मोहोर येण्यास प्रारंभ झालेला आहे. यंदा आंब्याचे पिक उशिराने मिळणार तोपर्यंत पावसाचे गोव्यात आगमन झालेले असेल. या विचाराने आंबा बागायतदार अडचणीत आलेले आहेत.
राज्यात सर्दी, पडसे, ताप, खोकला इत्यादींनी नागरिक हैराण झाले आहेत. डॉक्टरांच्या मते एकाच दिवशी दोन प्रकारच्या वातारवणाचा नागरिकांवर परिणाम होत आहे.









