सोशल मीडियावर सध्या ब्रिटनच्या बेडफोर्डचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक हॉट एअर बलून अत्यंत धोकादायकपणे नागरी वस्तीत उतरत असल्याचे दिसून येते. बेटफोर्डमध्ये हॉट एअर बलूनने अचानक नियंत्रण गमाविले आणि थेट नागरी वस्तीतील रस्त्यावर ते उतरले आहे. यामुळे लोक घाबरून गेले. चहुबाजूला उभी वाहने, खांब आणि रस्त्यांवर लटकणाऱ्या वीजवाहिन्यांदरम्यान हा हॉट एअर बलून रस्त्यावर उतरला आहे. परंतु तेथे उपस्थित एका इसमाने साहस दाखवत स्थिती सांभाळल्याचे व्हिडिओत दिसून येते.
स्थानिक रहिवासी सॅम कोल्डहॅम हे स्वत:च्या पार्टनर सियान मारी किंग यांच्यासोबत फेरफटका मारत असतान त्यांना बलून आकाशातून खाली येताना दिसला, त्याची वीजवाहिन्यांशी टक्कर होण्याची शक्यता पाहून सॅम यांनी वेळ न दवडता दोरखंड पकडला हॉट एअर बलूनमधील लोकांना सुरक्षितपणे खाली उतरविले. वारा नसल्याने हॉट एअर बलूनने स्वत:चा वेग गमावला होता, सॅम यांनी आमचा जीव वाचविल्याचे क्रू मेंबर्सनी म्हटले आहे. हॉट एअर बलून घरांच्या छताला धडकण्याचे किंवा वीजवाहिन्यांच्या संपर्कात येण्याचा धोका हेता, परंतु सॅम यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे लोकांचा जीव वाचला आहे.
बलून कुठल्याही दुर्घटनेशिवाय सुरक्षितपणे उतरला असून सर्व लोक सुरक्षित आहेत असे ब्रिटिश बलून अँड एअरशिप क्लबने वक्तव्य जारी करत म्हटले आहे. तर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर होत असून लोकांनी याला चमत्कारी लँडिंग संबोधित सॅम यांना खरा हिरो ठरविले आहे.









