वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात येणाऱ्या 2023 सालातील आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारत विजयासाठी फेवरिट ठरेल, असे वैयक्तिक मत इंग्लंडचा माजी कर्णधार इयान मॉर्गनने व्यक्त केले आहे.
2019 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळवणाऱ्या इंग्लंड संघाचे नेतृत्व इयान मॉर्गनने केले होते. सध्या इंग्लंडचा संघ निश्चितच दर्जेदार आणि बलवान आहे. तथापि भारतीय संघाला ही स्पर्धा आपल्याच देशात होत असल्याने खेळपट्ट्या आणि वातावरणाचा फायदा अधिक होईल. खेळपट्ट्यांचा स्वभाव त्यांना अवगत असल्याने भारतीय संघ या स्पर्धेत विजेतेपदासाठी फेवरिट राहिल तर इंग्लंडला उपविजेतेपद मिळू शकेल असे वैयक्तिक मत माजी कर्णधार मॉर्गनने व्यक्त केले आहे.
2019 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम सामन्याच्या आठवणी आजही ताज्याच आहेत. न्यूझीलंडबरोबर झालेला हा अंतिम सामना मी कधीच विसरू शकणार नाही असे मॉर्गनने म्हटले आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा संदर्भात मॉर्गनने कौतुकाचे उद्गार काढले आहे. रोहित शर्मा हा एक कुशल कर्णधार असून त्याच्याकडे कप्तानपदाचे चांगले गुण अवगत असल्याचे मॉर्गनने म्हटले आहे. अलीकडच्या काही कालावधीत इंग्लंड संघाचा दर्जा निश्चित वाढला आहे यात शंका नाही. इंग्लंडचा संघ हा जगातील एक अव्वल म्हणून सध्या ओळखला जातो. तथापि इंग्लंड संघाला आपण रेटिंगमध्ये दुसरे स्थान देत असून तो या आगामी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा फेवरिट ठरू शकेल. 2011 मध्ये भारतात झालेल्या, 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या, 2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील संघांचा आढावा घेतल्यास 2011 साली भारताने, 2015 साली ऑस्ट्रेलियाने तर 2019 साली इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली होती. 2023 ची स्पर्धा भारतात होत असल्याने यजमान देशाला इतर संघांच्या तुलनेत जेतेपदाची शक्यता अधिक असल्याचे मार्गन याने म्हटले आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघामध्ये जागतिक दर्जाचे अव्वल फलंदाज आणि गोलंदाजांचा समावेश असल्याने या आगामी स्पर्धेत इंग्लंडची कामगिरी निश्चितच चांगली होईल अशी आशा मॉर्गनने व्यक्त केली.
सर्वोत्तम चार संघाची निवड करण्यास मला सांगितले तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांचा यामध्ये समावेश राहिल. आगामी विश्वचषक स्पर्धेतील सामने भारतातील विविध शहरांमध्ये आयोजित केले आहेत. इतर देशांची या स्पर्धेत सत्त्वपरीक्षा ठरेल. दरम्यान मी निवडलेल्या चार संघामध्ये कमाल सखोलता आणि अष्टपैलूता असल्याचे मॉर्गनने म्हटले आहे. बोरिया समवेत आयोजिलेल्या एका समारंभामध्ये माजी कर्णधार इयान मॉर्गनने आपले हे विचार मांडले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची मॉर्गनने स्तुती केली आहे. रोहित शर्मा कर्णधार आणि संघप्रमुख म्हणून माझा सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे. कोणत्याही स्पर्धेमध्ये संपूर्ण संघाला व्यवस्थित मार्गदर्शन करत पुढे घेऊन जाण्याची क्षमता रोहित शर्मामध्ये निश्चितच असल्याचे जाणवते त्यामुळे मी त्याचा फॅन असल्याचे मॉर्गनने सांगितले. विविध देशांचे अव्वल क्रिकेटपटूही रोहित शर्माचा नेहमीच आदर करतात. ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्माची उपस्थिती संघाला पोषक वातावरण करून देणारी असते. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन खेळाडूंची ड्रेसिंग रुममधील उपस्थिती इतर खेळाडूंना आत्मविश्वास वाढवणारी असते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे आपल्या संघातील इतर खेळाडूंबरोबरचे संबंध नेहमीच सलोख्याचे राहतात. त्याचा फायदा संघाला मिळत असतो. मात्र यावेळी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये महत्त्वाचा बदल पाहावयास मिळेल. 2011 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा कर्णधार म्हणून कार्यरत नव्हता पण 2023 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करीत असल्याने भारतीय ड्रेसिंग रुममध्ये हा प्रमुख बदल दिसेल असेही मॉर्गनने म्हटले आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या क्रिकेटपटूविरुद्ध मैदानात लढण्यात निदान मला तरे आवडले नसते. विराट कोहली हा जागतिक क्रिकेट क्षेत्रातील एक महान खेळाडू म्हणून ओळखला जात असून तो सध्याच्या कालावधीत एक सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मॉर्गनने म्हटले आहे. कोहली नेहमीच मोठ्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणे पसंत करत असतो. त्याची जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वास यांची योग्य सांगड घालून तो नेहमी मैदानात उतरत असतो. अनेक सामन्यामध्ये त्याने एक हाती संघाला विजय मिळवून दिला आहे. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता कोहली आजही तितकीच जीवंत आहे असेही माजी कर्णधार मॉर्गनने म्हटले आहे. मैदानात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आता कोहलीवर पूर्वीसारखे दडपण राहणार नाही. त्याच्यावर कप्तानपदाची जबाबदारी नसल्याने तो आता बिनधास्त खेळू शकेल. रोहित शर्माकडून नेहमीच कोहलीला सहकार्य मिळत असल्याने कोहलीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. दरम्यान हे दोन महान खेळाडू यावेळी आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघातून खेळत असल्याने यजमान भारताला विश्वचषक जिंकण्याची अधिक संधी आहे असे प्रतिपादन मॉर्गनने केले.









