अॅशेस मालिका, चौथी कसोटी दुसरा दिवस : क्रॉलेचे नाबाद शतक, मोईनचे अर्धशतक, चहापानापर्यंत इंग्लंड 2 बाद 239
मँचेस्टर : 2023 अॅशेस मालिकेतील येथे सुरू झालेल्या चौथ्या कसोटीत गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात चहापानापर्यंत 2 बाद 239 धावा जमवल्या. क्रॉले 132 तर रुट 44 धावावर खेळत होते. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 317 धावात आटोपला. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने पाच बळी टिपले. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले सलग दोन सामने जिंकल्यानंतर इंग्लंडने तिसरा सामना जिंकून आपले आव्हान जिवंत राखले आहे. या चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात लाबुशेन व मिचेल मार्श यांची अर्धशतके आणि स्टार्कच्या नाबाद 36 धावांच्या बळावर 317 धावा जमवल्या. या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 8 बाद 299 धावापर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात लाबुशेनने 6 चौकारासह 51, मिचेल मार्शने 1 षटकार आणि 7 चौकारासह 51, स्टिव्ह स्मिथने 1 षटकार आणि 5 चौकारासह 41, हेडने 7 चौकारासह 48, वॉर्नरने 3 चौकारासह 32, ग्रीन 1 चौकारासह 16, कॅरेने 2 चौकारासह 20 धावा जमवल्या. स्टार्कने चिवट फलंदाजी करीत 93 चेंडूत 6 चौकारासह नाबाद 36 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी आपले शेवटचे दोन गडी 18 धावात गमवले. अँडरसनने पॅट कमिन्सला एका धावेवर झेलबाद केले तर त्यानंतर वोक्सने हॅझलवूडला 4 धावावर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 317 धावावर रोखले. इंग्लंडतर्फे वोक्सने 62 धावात 5, ब्रॉडने 68 धावात 2 तर अँडरसन, मार्क वूड आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
इंग्लंडचा आक्रमक खेळ
इंग्लंडच्या पहिल्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. तिसऱ्या षटकातच स्टार्कने सलामीच्या डकेटला कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने एक धाव जमवली. त्यानंतर क्रॉले आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस बढती मिळालेल्या मोईन अलीने सावध पण भक्कम खेळी केली. उपाहारावेळी इंग्लंडने 16 षटकात 1 बाद 61 धावा जमवल्या होत्या. क्रॉले 26 तर मोईन अली 31 धावावर खेळत होते. या जोडीने अर्धशतकी भागीदारी 80 चेंडूत नोंदवली. उपाहारानंतर क्रॉले आणि मोइन अली यांनी वनडे क्रिकेटप्रमाणे फलंदाजी करत धावांची गती वाढवली. या जोडीने शतकी भागीदारी 127 चेंडूत झळकवली. इंग्लंडचे शतक 134 चेंडूत फलकावर लागले. मोईन अली तसेच क्रॉले यांनी आपली अर्धशतकेही पूर्ण केली. क्रॉलेने 67 चेंडूत 7 चौकारासह तर मोईन अलीने 74 चेंडूत 7 चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी 25 षटकात नोंदवली. स्टार्कने मोईन अलीला ख्वाजाकरवी झेलबाद केले. त्याने 82 चेंडूत 7 चौकारासह 54 धावा जमवल्या. मोईन अली बाद झाल्यानंतर क्रॉलेला रुटकडून चांगली साथ मिळाली. कॉलेने आपले शतक 1 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 93 चेंडूत झळकवले तर त्याने रुटसमवेत तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 109 धावांची भागीदारी केली होती. चहापानावेळी क्रॉले 2 षटकार आणि 14 चौकारासह 132 तर रुट 35 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 44 धावावर खेळत होते. चहापानावेळी इंग्लंडने 2 बाद 239 धावा जमवल्या होत्या. इंग्लंडचा संघ अद्याप 78 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 50 धावात दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 90.2 षटकात सर्वबाद 317 (वॉर्नर 32, ख्वाजा 3, लाबुशेन 51, स्मिथ 41, हेड 48, मार्श 51, ग्रीन 16, कॅरे 20, स्टार्क नाबाद 36, अवांतर 14, वोक्स 5-62, ब्रॉड 2-68, अँडरसन 1-51, मोईन अली 1-65), इंग्लंड प. डाव 41 षटकात 2 बाद 239 (क्रॉले खेळत आहे 132, डकेट 1, मोईन अली 54, रुट खेळत 44, अवांतर 8, स्टार्क 2-50).
(धावफलक चहापानापर्यंत)
स्टुअर्ट ब्रॉड 600 विकेट घेणारा पाचवा गोलंदाज
19 जुलै रोजी स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स पूर्ण केले. तो त्याचा देशबांधव जेम्स अँडरसननंतर कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. 37 वर्षीय ब्रॉडने ओल्ड ट्रॅफर्ड येथील चौथ्या अॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला बाद करून हा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा तो पाचवा गोलंदाज आहे. त्याच वेळी, त्याच्या नावावर कसोटीत 3640 धावा आहेत. विशेष म्हणजे, जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड ही कसोटीमधील यशस्वी जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांनी आतापर्यंत एकत्र 137 कसोटी सामने खेळले आहेत. यात दोघांनी मिळून एकूण 1033 विकेट घेतल्या आहेत. याआधी ग्लेन मॅकग्रा (488) आणि शेन वॉर्न (513) यांनी 104 कसोटीत 1001 विकेट घेतल्या होत्या.
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 133 सामने 800 बळी
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) 145 सामने 708 बळी
- जेम्स अँडरसन (इंग्लंड) 182 सामने 688 बळी
- अनिल कुंबळे (भारत) 132 सामने 619 बळी
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) 166 सामने 600 बळी









