टॅमी बेमाँटचे दमदार द्विशतक, इंग्लंड प. डाव 6 बाद 437
वृत्तसंस्था/ नॉटींगहॅम
यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील येथे सुरू असलेल्या पहिल्याच अॅशेस मालिकेतील एकमेव कसोटीत टॅमी बेमाँटच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले. शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने शेवटची बातमी हाती आली त्यावेळी पहिल्या डावात 6 बाद 437 धावा जमविल्या होत्या. बेमाँटने 317 चेंडूत 26 चौकारांसह आपले द्विशतक पूर्ण केले. चहापानानंतर बेमाँटने आपले हे द्विशतक झळकविले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 473 धावा जमविल्या आहेत. इंग्लंडचा संघ अद्याप 35 धावांनी पिछाडीवर आहे.
या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 473 धावांचा डोंगर रचला. सदरलँडने नाबाद शतक (137), पेरीने (99) तसेच मॅकग्राने (61) धावांचे योगदान दिले. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 5 गडी बाद केले. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावाला दमदार सुरुवात केली. शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 53 षटकात 2 बाद 218 धावा जमविल्या होत्या. बेमाँटने आपले शतक पूर्ण केले होते.

इंग्लंडने 2 बाद 218 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने 3 बाद 308 धावांपर्यंत मजल मारली होती. बेमाँट आणि नॅट स्किव्हेर ब्रंट यांनी तिसऱ्या गड्यासाठी 137 धावांची शतकी भागीदारी केली. उपाहारापूर्वी ब्रंट गार्डनरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 111 चेंडूत 12 चौकारांसह 78 धावा जमविल्या. इंग्लंडचे त्रिशतक 79.1 षटकात फलकावर झळकले. उपाहारावेळी बेमाँट 144 तर डंकले 7 धावावर खेळत होती.
खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर बेमाँटने आपले दीड शतक 229 चेंडून 22 चौकारांच्या मदतीने झळकविले. इंग्लंडच्या 350 धावा 95.3 षटकात धावफलकावर लागल्या. दरम्यान गार्डनरने डंकलेचा 9 धावावर त्रिफळा उडविला. डंकले बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या वेटने बेमाँटला चांगलीच साथ दिली. या जोडीने 5 व्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. ब्राऊनने वेटला 44 धावावर झेलबाद केले. वेटने आपल्या खेळीमध्ये 49 चेंडूत 7 चौकार नोंदविले. चहापानापूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा आणखी एक गडी बाद केला. पेरीने जोन्सला झेलबाद केले. तिने 3 चौकारांसह 13 धावा जमविल्या. चहापानावेळी बेमाँट 309 चेंडूत 26 चौकांरासह 195 धावांवर तर इक्लेस्टोन 9 धावावर खेळत आहे. ऑस्ट्रेलियातर्फे गार्डनरने 3 तर ब्राऊन, सदरलँड आणि पेरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने चहापानापूर्वी दुसरा नवा चेंडू घेतला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव – 124.2 षटकात सर्वबाद 473, इंग्लंड प. डाव – 111 षटकात 6 बाद 428 (लँब 10, बिमाँट खेळत आहे 195, नाईट 57, नॅट स्किव्हेर ब्रंट 78, डंकले 9, वेट 44, जोन्स 13, इक्लेस्टोन खेळत आहे 9, अवांतर 13 सदरलँड 1-56, ब्राऊन 1-78, पेरी 1-39, गार्डनर 3-89)
धावफलक चहापानापर्यंत









