महिला-बालकल्याण खात्यामार्फत तीन ठिकाणी उभारणी : महिला सक्षमीकरणासाठी पाऊल
प्रतिनिधी /बेळगाव
नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी महिला वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे नोकरदार आणि परराज्यांतून आलेल्या महिलांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. महिला व बालकल्याण खात्यामार्फत शहरात तीन ठिकाणी महिला वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाला हातभार लागला आहे.
शहरात शैक्षणिक संस्था, खासगी रुग्णालये, उद्योगधंदे आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. दरम्यान, अशा महिलांसमोर आसऱ्याचा प्रश्न आहे. शिवाय परराज्यांतून आलेल्या महिलांच्या राहण्याचा प्रश्न आहे. अशा महिलांसाठी खात्याने आझमनगर, उद्यमबाग आणि काळी आमराई या ठिकाणी वसतिगृहे उभारली आहेत. त्यामुळे शहरातील नोकरदार महिलांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
उद्यमबाग आणि शहरातील इतर ठिकाणी दिवसा आणि रात्रीच्या वेळी कामाला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. अशा महिलांना निवासासाठी धडपड करावी लागते. मात्र, खात्याने अशा महिलांसाठी वसतिगृहे उभारली आहेत. त्यामुळे महिलांना या ठिकाणी राहता येणार आहे. वाढत्या महागाईमुळे स्वत: घरे घेणे शक्य नाही, अशा परिस्थितीत ही वसतिगृहे महिलांना सोयीस्कर ठरणार आहेत. प्रत्येक वसतिगृहात 50 महिलांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे.
एका खोलीत दोन-तीन महिलांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय 2400 रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे. महिलांना सवलतीच्या दरात ही वसतिगृहे उपलब्ध करून दिली जात आहेत. संबंधित महिलांनी महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृहात महिलांनाच प्रवेश
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी शहरात तीन वसतिगृहे उभारली आहेत. 50 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्या महिलांना या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. याबरोबर ग्रामीण भागातील महिलांसाठीही वसतिगृहे उभारली जाणार आहेत. या वसतिगृहांचा महिलांनी लाभ घ्यावा.
ए. एम. बसवराज, सहसंचालक, महिला व बाल कल्याण खाते









