कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
अनाथ किंवा एकल पालक असलेल्या 18 ते 23 वर्षापर्यंतच्या मुलासाठी कसबा बावड्यात शासकीय पुरुष वसतीगृह आहे. सद्या याठिकाणी दहा मुले वास्तव्यास असून शासनाकडून त्यांचे संगोपन होत आहे. येथील मुले काम करुन शिक्षण घेतात. यामुळे अनाथ मुलांसाठी हे वसतीगृह आधार ठरत आहे.
मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलात नवजात शिशुपासून मुले दाखल होतात. येथील कित्येक मुले अनाथ असतात. तसेच काही मुले आई किंवा वडील नसलेले असतात. याशिवाय लहान वयात भरटकलेल्या मुलांना याठिकाणी ठेवले जाते. येथे त्या मुलांना शिक्षण देण्यासह त्यांना घडवले जाते. बालकल्याण संकुलात 18 वर्षापर्यंतच्या मुलांना ठेवले जाते. अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले जाते. आईवडिल नसलेल्या मुलांना त्यांचे जवळचे नातेवाईक घेऊन जातात. पण ज्यांना कोणीच नाही त्यांच्यासाठी पुरुष शासकीय वसतीगृहाचा आधार आहे. अठरा ते 23 वर्षापर्यंतच्या मुलांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. शासनाकडून या मुलांवर खर्च केला जातो. स्वत: कमवून त्यांना शिक्षणही घेता येते. त्याप्रमाणे येथील शासकीय पुरुष वसतीगृहात सद्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 10 मुले वास्तव्यास आहेत. बहुतांश सर्व मुले बाहेर काम करुन शिक्षणही घेत आहेत. आतापर्यंत या वसतीगृहातून 1360 मुले बाहेर पडली आहेत.
- शासनाकडून अनाथ प्रमाणपत्र–
आईवडिल नसलेल्या आणि पुरुष वसतीगृहातील मुलांना शासनाकडून अनाथ प्रमाणपत्रे दिले जाते. कोल्हापूरातील या वसतीगृहात अशी प्रमाणपत्रे असलेली सहा मुले आहेत. त्यांच्यासाठी शासकीय नोकरीत एक टक्का आरक्षण आहे.
- वसतीगृहातील मुले शासकीय सेवेत
पुरुष वसतीगृहात राहणारी मुले उच्च शिक्षण घेतात.याठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यात येते.तसेच सीएसआर निधीतून त्यांना मदत दिली जाते.गेल्या काही वर्षात येथील मुले शासकीय नोकरीत गेली आहेत.एक येरवडा कारागृहात कर्मचारी आहे, तर त्याचाच भाऊ सैन्यात गेला आहे.
–महाराष्ट्रातील पुरुष शासकीय वसतीगृह– पुणे, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नागपूर याठिकाणी पुरुष वसतीगृहे आहेत. तर नाशिकला महिला वसतीगृह आहे.
–बालगृहातून 18 वर्षे पूर्ण झालेली मुले स्वेच्छेने अनुरक्षणमध्ये येतात. अनुरक्षणमध्ये 18 ते 23 वर्षापर्यंत राहण्याची मुभा आहे.
–कोल्हापूरात 1958 पासून हे वसतीगृह सुरु आहे. या वसतीगृहात 100 मुलांची मान्यता आहे. मात्र वसतीगृहाच्या इमारतीची क्षमता केवळ 40 आहे.
–सद्या या पुरुष वसतीगृहात फक्त 10 मुलांचे वास्तव्य
–शासकीय पुरुष वसतीगृहाला मिळणारा वार्षिक निधी – 60 लाख
–इमारतीचे महिन्याचे भाडे– 73 हजार
–आजअखेर वसतीगृहातून बाहेर पडलेली मुले– 1360
– दीड वर्षे इमारतीचे भाडे थकित
- मुलांच्या शैक्षणिक,सामाजिक कार्यावर भर
पुरुष वसतीगृहात येणारी मुले बालगृहातून येतात.18 ते 23 वर्षापर्यंतची ही मुले असतात.अनाथ तसेच आई किंवा बाप नसलेली मुले स्वेच्छेने येथे येतात.हे वय त्यांच्या जडणघडणीचे असतात.यामुळे त्यांना रोजगार देवून शैक्षणिक,सामाजिक कार्यावर भर दिला जातो.सद्या वसतीगृहाला भाडयाने इमारतीची आवश्यकता असून इच्छुकांनी वसतीगृह कार्यालयाशी संपर्क साधावा.
सागर डवरी – अधीक्षक, शासकीय पुरुष वसतीगृह
- जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव सादर
शासकीय पुरुष वसतीगृह आणि महिलासाठीचे तेजस्विनी महिला वसतीगृह भाड्याच्या जागेत आहे. भाड्याच्या इमारतीमध्ये अडथळे येतात. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जागेसाठी प्रस्ताव सादर केला आहे.








