पाचव्या सामन्यात इंग्लंडवर 4 गड्यांनी मात, गुडाकेश मोती ‘सामनावीर’, फिल सॉल्ट ‘मालिकावीर’
वृत्तसंस्था/ तेरोबा
a या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या पाचव्या आणि शेवटच्या दिवस-रात्रीच्या सामन्यात विंडीजने इंग्लंडचा चार गड्यांनी पराभव केला. विंडीजचा मोती तर इंग्लंडचा फिल सॉल्ट यांची अनुक्रमे सामनावीर आणि मालिकावीरासाठी निवड करण्यात आली.
या मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 19.3 षटकात 132 धावांत आटोपला. त्यानंतर विंडीजने 19.2 षटकात 6 बाद 133 धावा जमवित हा सामना चार गड्यांनी तसेच मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या फिल सॉल्टने 22 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 38, कर्णधार बटलरने 11 चेंडूत 2 चौकारासह 11, लिव्हिंगस्टोनने 29 चेंडूत 2 षटकारासह 28, मोईन अलीने 21 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 23, सॅम करनने 15 चेंडूत 12 धावा जमवल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 5 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. विंडीजच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत इंग्लंडला 150 धावांचा टप्पा ओलांडण्यापासून रोखले. विंडीजतर्फे मोती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 24 धावात 3 गडी बाद केले. आंद्रे रसेल, अकिल हुसेन आणि होल्डर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या सहा षटकात 50 धावात जमवताना 2 गडी गमवले. इंग्लंडचे अर्धशतक 36 चेंडूत, शतक 77 चेंडूत नोंदवले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सलामीच्या चार्ल्सने 22 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 27, निकोलास पुरनने 6 चेंडूत 1 षटकारासह 10, शाय होपने 43 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 43, रुदरफोर्डने 24 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 30, कर्णधार पॉवेलने 6 चेंडूत 1 षटकारासह 8, किंगने 3 तर रसेलने 3 धावा जमवल्या. होल्डर आणि होप या जोडीने विजयाचे सोपस्कार 4 चेंडू बाकी असताना पूर्ण केले. विंडीजच्या डावात 7 षटकार आणि 4 चौकार नोंदवले गेले. विंडीजच्या डावामध्ये पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 39 धावा जमवताना 2 गडी गमवले. विंडीजचे अर्धशतक 42 चेंडूत तर शतक 91 चेंडूत फलकावर लागले. पहिल्या 10 षटकात विंडीजने 3 बाद 62 धावा जमवल्या होत्या. इंग्लंडतर्फे टॉप्ले आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2 तर वोक्स आणि सॅम करन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 19.3 षटकात सर्वबाद 132 (सॉल्ट 38, बटलर 11, लिव्हिंगस्टोन 28, मोईन अली 23, सॅम करन 12, जॅक्स 17, अवांतर 3, मोती 3-24, रसेल, अकिल हुसेन आणि होल्डर प्रत्येकी दोन बळी).
विंडीज 19.2 षटकात 6 बाद 133 (चार्ल्स 27, किंग 3, पुरन 10, शाय होप नाबाद 43, रुदरफोर्ड 30, पॉवेल 8, रसेल 3, होल्डर नाबाद 4, अवांतर 5, टॉप्ले 2-17, आदिल रशीद 2-21, वोक्स 1-28, सॅम करन 1-13).









