वर्ल्ड कप : बांगलादेशवर 7 गड्यांनी मात, सामनावीर कोहलीचे नाबाद शतक, गिलचे अर्धशतक, रोहितची फटकेबाजी
वृत्तसंस्था /पुणे
2023 fिवश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सलग चौथा विजय नोंदविला. न्यूझीलंडइतकेच भारताचेही 8 गुण झाले आहेत. मात्र न्यूझीलंडचा रनरेट सरस असल्याने ते पहिल्या स्थानावर आहेत. या सामन्यात सामनावीर विराट कोहलीने दमदार नाबाद शतक (103) झळकाविले. कोहलीचे या स्पर्धेतील हे पहिले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 78 वे तसेच वनडे क्रिकेटमधील 48 वे शतक आहे. गिलने अर्धशतक झळकाविले तर शर्माने 40 चेंडूत 48 धावांची खेळी केली. तत्पूर्वी बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 256 धावा जमविल्या होत्या.
या स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासूनच फलंदाजी आणि गोलंदाजीत योग्य ताळमेळ कायम राखल्याचे दिसून येते. भारताची फलंदाजी समाधानकारक होत असून त्याला गोलंदाजीची योग्य साथ मिळत असल्याने प्रतिस्पर्धी संघांना विजय मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे.
बांगलादेशच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देताना कर्णधार शर्मा आणि गिल या सलामीच्या जोडीने पहिल्या षटकापासूनच आक्रमक फटकेबाजीवर भर दिला. या जोडीने 12.4 षटकात 88 धावांची भागीदारी केली. पहिल्या पॉवरप्ले षटकात भारताने 63 धावा झोडपल्या. रोहित आणि गिल यांनी अर्धशतकी भागीदारी 54 चेंडूत नोंदविली. त्यामध्ये शर्माचा वाटा 37 धावांचा होता. डावातील 13 व्या षटकात बांगलादेशच्या हसन मेहमुदने कर्णधार शर्माला हृदोयकरवी झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 48 धावा जमविल्या. शुभमन गिलने या स्पर्धेत आपले पहिले अर्धशतक झळकाविले. भारताचे शतक 79 चेंडूत नोंदविले गेले. गिलने 52 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. त्याने कोहलीसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. अर्धशतक नोंदविल्यानंतर गिल फार वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. मेहदी हसन मिराजने गिलला झेलबाद केले. त्याने 55 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 53 धावा जमविल्या. भारताची स्थिती यावेळी 19.2 षटकात 2 बाद 132 अशी होती. गिल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरने कोहलीला बऱ्यापैकी साथ दिली. कोहली आणि अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. भारताचे दीडशतक 138 चेंडूत फलकावर लागले. कोहलीने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 48 चेंडूत नोंदविले. 30 व्या षटकात बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने श्रेयसला मेहमुदुल्लाकरवी झेलबाद केले. त्याने 25 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावा केल्या.
कोहली आणि केएल राहुल या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 83 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला 51 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी विजय मिळवून दिला. कोहलीने शेवटी विजयी षटकार खेचत आपले शतक पूर्ण केले. कोहलीने 97 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 103 तर राहुलने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 34 धावा जमविल्या. भारताचे द्विशतक 203 चेंडूत तर 250 धावा 243 चेंडूत नोंदविल्या गेल्या. भारताचा पुढील सामना न्यूझीलंडबरोबर रविवार दि. 22 रोजी धरमशाला येथे होणार आहे. न्यूझीलंड संघानेही या स्पर्धेत पहिले सलग चार सामने जिंकले असल्याने हा रविवारचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 256 धावा जमविल्या. तन्झिद हसन आणि लिटन दास यांनी अर्धशतके झळकविली. तर मेहमूदुल्लाने शेवटच्या क्षणी फटकेबाजी करत 46 धावा जमविल्या. भारतातर्फे बुमराह, सिराज, जडेजा यांनी प्रत्येकी 2 तर शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याचा घोटा मुरगळल्याने त्याला मैदान सोडावे लागले. केवळ 3 चेंडू टाकल्यानंतर तो पॅव्हेलियनकडे परतल्याने विराट कोहलीने उर्वरीत 3 चेंडू टाकून षटक पूर्ण केले.
बांगलादेशचा कर्णधार नजमूल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले आहे. गुरुवारच्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली. तन्झिद हसन आणि लिटन दास या जोडीने पहिल्या 5 षटकानंतर आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने 14.4 षटकात 93 धावांची दमदार भागीदारी केली. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या या जोडीने फटकेबाजी करण्याचे धाडस दाखविले. बांगलादेशने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 63 धावा जमविल्या. याचवेळी अष्टपैलू हार्दिक पंड्याला दुखापत झाल्याने इतर गोलंदाजावर अधिक दडपण आले. डावातील 9 व्या षटकात पंड्या चेंडू अडवताना त्याचा घोटा मुरगळला. लिटन दासचा सरळ मारलेला फटका उजवा पाय घालून अडविण्याच्या प्रयत्नात हार्दिकला ही दुखापत झाली. भारताला यावेळी एकही गडी बाद करता आला नव्हता. बांगलादेशचे अर्धशतक 56 चेंडूत फलकावर लागले. तन्झिद हसनने आपले अर्धशतक 41 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. कुलदीप यादवने बांगलादेशची ही जोडी अखेर फोडली. डावातील 15 व्या षटकात यादवने हसनला पायचीत केले. त्याने 43 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावा जमविल्या. बांगलादेशचे शतक 104 चेंडूत फलकावर लागले.
कर्णधार शर्माने दुसऱ्या बाजूने गोलंदाजीत बदल करून जडेजाकडे चेंडू सोपविल्या. त्याने 20 व्या षटकात कर्णधार नजमूल हुसेन शांतोला 8 धावावर पायचीत केले. मोहम्मद सिराजने मेहदी हसन मिराजला यष्टीरक्षक राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 3 धावा जमविल्या. आत्मविश्वासाने फलंदाजी करणारा दास जडेजाचा दुसरा बळी ठरला. गिलने दासचा अप्रतिम झेल टिपला. दासने 82 चेंडूत 7 चौकारांसह 66 धावा जमविल्या. रहिम आणि हृदोय या जोडीने पाचव्या गड्यासाठी 42 धावांची भर घातली. शार्दूल ठाकुर हृदोयला गिलकरवी झेलबाद केले. त्याने 35 चेंडूत 16 धावा जमविल्या. बांगलादेशची स्थिती यावेळी 37.2 षटकात 5 बाद 179 अशी होती. बांगलादेशचा संघ 300 धावा ओलांडेल असे वाटत होते. बांगलादेशच्या 150 धावा 187 चेंडूत फलकावर लागल्या. बांगलादेशने दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या षटकामध्ये 126 धावा जमविताना 5 गडी गमविले.
मेहमूदूल्ला आणि रहिम यांनी समयोचित फटकेबाजी केल्याने बांगलादेशला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. या जोडीने 6 व्या गड्यासाठी 22 धावांची भर घातली. बुमराहने आपल्या दुसऱ्या हप्त्यातील गोलंदाजीत रहिमला जडेजाकरवी झेलबाद केले. जडेजाने हा अप्रतिम झेल टिपला. रहिमने 46 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 38 धावा जमविल्या. मेहमूदूल्लाने नसूम अहमद समवेत 7 व्या गड्यासाठी 32 धावांची भर घातली. मोहम्मद सिराजने नसूम अहमदला राहुलकरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. बांगलादेशचे द्विशतक 253 चेंडूत तर 250 धावा 298 चेंडूत नोंदविल्या गेल्या. शेवटच्या 10 षटकामध्ये बांगलादेशने 67 धावा जमविताना 3 गडी गमविले. डावातील शेवटचे षटक बुमराहने टाकले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मेहमूदूल्लाचा त्रिफळा उडाला. त्याने 36 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 46 धावा केल्या. बांगलादेशच्या फलंदाजांनी एकूण 8 षटकार आणि 18 चौकार नोंदविले. भारतातर्फे बुमराह, सिराज, जडेजा यांनी प्रत्येकी 2 तर ठाकुर आणि यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हार्दिक जखमी
या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. बांगलादेशच्या डावातील 9 व्या षटकात ही घटना घडली. पंड्या गोलंदाजी करत होता आणि त्याच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या दासने स्टेटड्राईव्हचा फटका मारला. त्यावेळी पंड्याने उजवा पाय घालून चेंडू अडविण्याचा प्रयत्न करताना त्याचा घोटा मुरगळला. लागलीच त्याला मैदान सोडावे लागले. पंड्याच्या दुखापतीची तपासणी सुरू असून त्याच्या दुखावलेल्या घोट्याचे स्कॅनिंग करण्यात आल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र पंड्या फलंदाजी करण्यासाठी उपलब्ध होईल, असे इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी म्हटले आहे. अद्याप हार्दिकच्या दुखापतीच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले.
संक्षिप्त धावफलक –
बांगलादेश – 50 षटकात 8 बाद 256 (तन्झिद हसन 51, लिटन दास 66, मेहमूदुल्ला 46, मुशफिकुर रहिम 38, हृदोय 16, नेसूम अहमद 14, बुमराह 2-41, मोहम्मद सिराज 2-60, रविंद्र जडेजा 2-38, ठाकुर 1-59, कुलदीप यादव 1-47),
भारत – 41.3 षटकात 3 बाद 261 (विराट कोहली 97 चेंडूत 4 षटकार, 6 चौकारांसह नाबाद 103, रोहित शर्मा 40 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 48, शुभमन गिल 55 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 53, श्रेयस अय्यर 25 चेंडूत 2 चौकारांसह 19, केएल. राहुल 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 34, अवांतर 4, मेहदी हसन मिराज 2-47, हसन मेहमुद 1-65).









