मलेशिया, विद्यमान विजेता कोरिया, जपान यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था / राजगिर (बिहार)
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या आशिया चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत कर्णधार हरमनप्रित सिंगच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर यजमान भारताने चीनवर 4-3 अशा गोल फरकाने निसटता विजय मिळवित विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील अन्य सामन्यांत मलेशिया, विद्यमान विजेता कोरिया तसेच जपान यांनी आपले सामने जिंकून मोहिमेला शानदार सुरूवात केली.
सदर स्पर्धा आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेतील विजेत्या संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे. भारत-चीन यांच्यातील सामन्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली उपस्थिती दर्शविली. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हॉकी जादुगार मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली. भारताचा पुढील सामना रविवारी जपानबरोबर तर चीनचा सामना कझाकस्तानबरोबर होईल.
भारत आणि चीन यांच्यातील या सलामीच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना 11 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि त्यापैकी चार कॉर्नर्सवर गोल नोंदविला. कर्णधार हरमनप्रित सिंगने 20 व्या, 33 व्या, 47 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर्सवर गोल नोंदविले. मात्र हरमनप्रित सिंगकडून पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदविता आला नाही. भारताचा चौथा गोल जुगराज सिंगने 18 व्या मिनिटाला केला. चीनतर्फे 12 व्या मिनिटाला शिहाओ डूने, बेनहेल चेनने 35 व्या मिनिटाला तर जिशेंग गाओने 41 व्या मिनिटाला गोल केले. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर मनदीप सिंगने शानदार चाल रचली आणि त्याने दिलेल्या पासवर संजयने मारलेला फटका चीनच्या गोलरक्षकाने थोपविला. यानंतर काही सेकंदांच्या अंतराने भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण मनदीपने मारलेला फटका पंचांनी नियमबाह्य ठरविल्याने भारताला खाते उघडण्यासाठी आणखी काही वेळ घालवावा लागला. 12 व्या मिनिटाला डूने संघाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून चीनला आघाडी मिळवून दिली. 14 व्या मिनिटाला भारताला आणखी गोल करण्याची संधी मिळाली होती. अभिषेकने मारलेला फटका चीनच्या बचाव फळीतील खेळाडूने थोपविला. जुगराज सिंगने 18 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून भारताला चीनशी बरोबरी साधून दिली. 20 व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने पेनल्टी कॉर्नरवर संघाचा दुसरा तर वैयक्तिक पहिला गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने चीनवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती.
सामन्यातील 33 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रित सिंगने संघाचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. भारताला ही आघाडी फारवेळ राखता आली नाही. 35 व्या मिनिटाला चेनने चीनचा दुसरा गोल केला. 39 व्या मिनिटाला भारताला पंचांनी पेनल्टी स्ट्रोक बहाल केला पण हरमनप्रित सिंगचा फटका गोलपोस्टच्या दांडीला दाळून बाहेर गेला. यानंतर दोन मिनिटांच्या कालावधीत गावोने पेनल्टी कॉर्नवर चीनचा तिसरा गोल केला. 47 व्या मिनिटाला भारताला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यामधील शेवटच्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रित सिंगने भारताचा तिसरा गोल नोंदविला. सामना संपण्यास केवळ तीन मिनिटे बाकी असताना भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रित सिंगने या संधीचा पुरेपूर फायदा घेत भारताचा चौथा तर वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून चीनचे आव्हान 4-3 अशा गोल फरकाने संपुष्टात आणले.
जपानचा एकतर्फी विजय
अ गटातील शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जपानने दुबळ्या कझाकस्तानचा 7-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. जपान संघातर्फे कोजी यामासाकीने 13 व्या आणि 36 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. कोसेई केवाबीने पहिल्याच मिनिटाला जपानचे खाते उघडले होते. नारा किमुराने 5 व्या मिनिटाला, केन नेगायोशीने 48 व्या मिनिटाला, यामादाने 50 व्या आणि शिनोहेराने 54 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात कझाकस्तानला आपले खाते शेवटपर्यंत उघडता आले नाही.
मलेशिया, कोरिया विजयी
ब गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात मलेशियाने दुबळ्या बांगलादेशचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करत विजयी सलामी दिली. त्यानंतर ब गटातील झालेल्या दुसऱ्या सामन्यात विद्यमान विजेत्या कोरियाने चीन तैपेईचा 7-0 असा एकतर्फी पराभव केला. ब गटातील या दुसऱ्या सामन्यात कोरियातर्फे डेन सनने 17 व्या, 29 व्या आणि 58 व्या मिनिटाला गोल नोंदवित शानदार हॅट्ट्रीक साधली. जीहून यांगने 27 व्या आणि 50 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर्सवर कोरियाचे दोन गोल केले. युनहो काँगने 54 व्या मिनिटाला तसेच सनने शेवटच्या मिनिटाला गोल केले.
या स्पर्धेतील अन्य एका सलामीच्या सामन्यात मलेशियाने बांगलादेशचा 4-1 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. जागतिक हॉकी मानांकनात मलेशिया 12 व्या स्थानावर आहे. मलेशियातर्फे तीन मैदानी गोल नोंदविले गेले. एसरान हमसेनीने 25 व्या मिनिटाला, अखिमुल्ला अनूरने 36 व्या मिनिटाला तर मुजाहीर अब्दुल रौफने 48 व्या मिनिटाला गोल केले. बांगलादेशतर्फे एकमेव गोल 16 व्या मिनिटाला अश्रफुल इस्लामने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. आता या स्पर्धेत मलेशियाचा पुढील सामना बलाढ्या आणि विद्यमान विजेत्या कोरियाबरोबर तसेच बांगलादेशचा सामना चीन तैपेईबरोबर खेळविला जाणार आहे.
शुक्रवारचे निकाल
भारत-चीन, 4-3,
मलेशिया-बांगलादेश, 4-1
कोरिया-चीन तैपेई, 7-0
जपान-कझाकस्तान, 7-0.









