तडफडून 3 जणांचा मृत्यू तरीही लोकांची असते गर्दी
रुग्णालय असे ठिकाण आहे, जेथे आजारी व्यक्तीवर उपचार केले जातात. आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास रुग्णालयात धाव घेतली जाते. परंतु अशा ठिकाणाला आरोग्यासाठी अपायकारक गोष्टीशी जोडले गेल्यास काय होईल? लास व्हेगासमध्ये एक हॉस्पिटल थीम्ड रेस्टॉरंट याच कारणामुळे चर्चेत आले आहे. या रेस्टॉरंटचे नाव हार्ट अटॅक ग्रिल आहे. हे रेस्टॉरंट स्वतःची थीम, मेन्यू आणि येथील सेवेमुळे व्हायरल होत आहे.
हार्ट अटॅक ग्रिलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. येथील मेन्यू आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक मानला जातो. येथील प्रत्येक खाद्यपदार्थ आकाराने खूपच मोठा असतो आणि कॅलरींनी भरलेला असतो. या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना ‘पेशंट’ असे संबोधिले जाते. तसेच ज्या कागदावर त्यांची ऑर्डर घेतली जाते, त्याला प्रिस्क्रिप्शन मानले जाते. सोशल मीडियावर या रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड व्हायरल होत आहे.
मेन्यूकार्डचे स्वरुप
या रेस्टॉरंटचा मेन्यू अत्यंत मोठय़ा आकाराच्या खाद्यपदार्थांनी भरलेला आहे. जर येथे शेक तयार केला जात असेल तर त्यात फॅटचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. येथील बर्गरचा आकार देखील खूपच मोठा असतो, सिंगल बायपास बर्गर तसेच ऑक्टोप्ले बायपास बर्गर अशी नावे देण्यात आली आहेत. येथे अनेक प्रकारचे हॉट डॉग्स, अल्कोहोल, नो फिल्टर सिगारेट देखील उपलब्ध केले जातात. हृदयविकाराच्या धक्क्याची जोखीम वाढविणारा प्रत्येक खाद्यपदार्थ या रेस्टॉरंटमध्ये मिळतो. या रेस्टॉरंटमध्ये मिळणारा क्वाड्रपल बायपास बर्गरचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील आहे, यात सुमारे 9983 कॅलरीजचा अंतर्भाव आहे.

अधिक वजनाच्या लोकांना मोफत
या रेस्टॉरंटने लोकांना एक खास ऑफरही दिली आहे. ज्या लोकांचे वजन 158 किलोपेक्षा अधिक आहे, त्यांना येथे मोफत खाद्यपदार्थ दिले जातात. या लोकांना खाताना चीयर देखील केले जाते. सोशल मीडियावर या रेस्टॉरंटची मोठी चर्चा होत आहे. स्वतःच्या याच वेगळेपणामुळे या रेस्टॉरंटने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे रेस्टॉरंट 2005 साली जॉन बसों नावाच्या व्यक्तीने सुरू केले होते. लोकांना अपायकारक खाद्यपदार्थांपासून दूर ठेवणे हा मूळ उद्देश होता, परंतु वस्तुस्थिती जाणून घेतल्यावरही लोक येथे गर्दी करत आहेत.









