सर्वच ठिकाणी अद्ययावत यंत्रणा आवश्यक असल्याचे चित्र आहे
By : संतोष कुंभार
शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यात मलकापूर येथे ग्रामीण रुग्णालय आहे. भेडसगाव, बांबवडे आणि माण येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आंबा, मांजरे, निनाई परळे येथील उपकेंद्रातून रुग्णांना सेवा दिली जात आहे. मात्र सर्वच ठिकाणी अद्ययावत यंत्रणा आवश्यक असल्याचे चित्र आहे.
मलकापूर ग्रामीण रुग्णालय मुख्य महामार्गावर आहे. येथे अनेक गंभीर रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे येथे अद्ययावत यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. मलकापूरात उपजिल्हा रुग्णालय काळाची गरज बनली आहे. तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालय तालुक्याच्या विविध गावांतील रुग्णांना आधारवड ठरत आहे.
प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या तर अधिक आहे. प्रसुतीच्या काळात अतिशय गंभीर स्थिती अनेक वेळा निर्माण होतते. अशावेळी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत यंत्रणेची उणीव जाणवते.
अद्यापही सोनोग्राफी सेंटर दुर्लक्षितच
मलकापूर ग्रामीण रुग्णालय रुग्णसेवेसाठी तत्पर आहे. मात्र प्रसुतीसाठी येणाऱ् गर्भवतींना मात्र येथे मोठा संघर्ष करावा लागत आहे. येथे सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने प्रसुतीकाळात अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर अथवा अन्य ठिकाणी पाठवावे लागत आहे.
मुळातच शाहूवाडी दुर्गम तालुका आहे. त्यामुळे येथे खेडेगावातून येणारे अनेक रुग्ण असतात. त्यांना पुढील उपचारासाठी अन्य दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी रुग्णांना आर्थिक भार सोसावा लागत असल्याने सोनोग्राफी सेंटर उभारणे आवश्यक आहे.
उपजिल्हा रुग्णालय गरजेचे
मलकापूर ग्रामीण रुग्णालय सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिह्यातील तालुक्याच्या सीमेवर आहे. याशिवाय येथे कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरून अनेक वेळा अपघात घडतात. अशा प्रसंगी गंभीर रुग्ण येथे दाखल होत असतात. मात्र आवश्यक सुविधा अभावी अशा रुग्णांवर तातडीचे उपचार करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना मर्यादा येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवावे लागते. त्यामुळे मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची काळाची गरज आहे.
आता जबाबदारी लोकप्रतिनिधीची
मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल झाला आहे. मात्र यासाठी आवश्यक बाबींची तात्काळ पूर्तता करून येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. महामार्गावरील या रुग्णालयात अधिक चांगल्या आरोग्य सुविधा होण्यासाठी लोकप्रतिनिधीनी उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गे लावावा, अशी मागणी आहे.
प्रस्ताव दाखल
“मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय होण्याबाबत प्रस्ताव शासन दरबारी दाखल झाला आहे. येथे अनेक गंभीर रुग्ण दाखल होत असतात. उपजिल्हा रुग्णालय तात्काळ झाल्यास बेडची संख्या वाढणार आहे. रुग्णांना अत्यावश्यक सोयीसुविधा तात्काळ मिळतील. गंभीर रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय होणे आवश्यक आहे.”
–डॉ. अभिषेक चावरे, वैद्यकीय अधिकारी, मलकापूर ग्रामीण रुग्णालय








