पोटावर चाकूने वार : वाचविण्यासाठी गेलेला युवकही जखमी : मयताच्या पत्नीसह चौघांना अटक
खानापूर : खानापूर शहराजवळ असलेल्या गांधीनगर येथील शनी-मारुती मंदिरात सुरेश तिमान्ना बंडीवड्डर (वय 32) या युवकाचा पोटावर चाकूने वार कऊन भीषण खून करण्यात आला. यावेळी सुरेशला वाचविण्यासाठी गेलेला सागर अष्टेकर हा युवक किरकोळ जखमी झाला आहे. सदर घटना रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली आहे. खुनी आरोपी स्वत: पोलीस स्थानकात हजर झाला. खानापूर पोलिसात गुन्ह्याची नेंद करण्यात आली असून मयताच्या पत्नीसह चौघांना अटक केली आहे. या खुनामुळे खानापूर परिसरात एकच खळबळ माजली आहे. गांधीनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शनी-मारुती मंदिर परिसरात तसेच गांधीनगर येथे बंदोबस्तासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. खानापूर पोलिसांनी यल्लाप्पा शांताराम बंडीवड्डर (वय 60), यशवंत ऊर्फ अनिल यल्लाप्पा बंडीवड्डर (वय 25), सावित्री यल्लाप्पा बंडीवड्डर (वय 55) व मयताची पत्नी स्नेहा सुरेश बंडीवड्डर (वय 27) या संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून चौघांना अटक केली आहे.
शनी-मारुती मंदिरात बैठकीतच वादावादी अन् चाकूने वार
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धारवाड जिल्ह्यातील तेग्गूर येथील रहिवासी असलेला सुरेश तिमान्ना बंडीवड्डर (वय 32) हा खानापूर-गांधीनगर येथे अलीकडे आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह वास्तव्य करून रहात होता. बेळगाव येथील खासगी कंपनीत अभियंता म्हणून तो नोकरीवर होता. गांधीनगर येथील रहिवासी असलेला अनिल बंडीवड्डर याचे मयत सुरेश बंडीवड्डर याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे सुरेश आणि अनिल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते.
या वादावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ आणि पंचमंडळी तसेच दोन्हीकडील नातेवाईकांची गांधीनगर येथील शनी-मारुती मंदिरात बैठक घेण्यात आली होती. नातेवाईक आणि पंचासमवेत बैठक सुरू होती. त्यावेळी सुरेश आणि यल्लाप्पा बंडीवड्डर यांच्यात जोरदार वादावादी झाली अन् रागाच्या भरात यल्लाप्पा बंडीवड्डर याने सुरेश बंडीवड्डर याच्या पोटावर चाकूने वार केला. त्यात सुरेश बंडीवड्डर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सुरेशला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असलेला सागर अष्टेकर (वय 30) हाही किरकोळ जखमी झाला आहे. त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपचारासाठी बेळगावला नेत असताना वाटेतच सुरेशचा मृत्यू
उपस्थितांनी सुरेश बंडीवड्डर याला तातडीने खानापूर रुग्णालयात आणण्यात आले. प्रथमोपचार करून त्याला अधिक उपचारासाठी बेळगावला नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती खानापूर पोलिसांना मिळताच खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक लालसाब गवंडी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी यल्लाप्पा बंडीवड्डर आणि अनिल बंडीवड्डर, सावित्री बंडीवड्डर आणि स्नेहा बंडीवड्डर यांना अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी खानापूर पोलिसांनी काही नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गांधीनगर-हलकर्णी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संशयितांना आज न्यायालयात हजर करणार
या घटनेची माहिती मिळताच बेळगाव जिह्याचे अतिरिक्त पोलीस प्रमुख बसरगी तसेच बैलहोंगल विभागाचे उपअधीक्षक वीरेश हिरेमठ हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शानाखाली गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. तसेच फॉरेन्सिक लॅबचे पथकही बोलावण्यात आले आहे. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या आहेत. खून प्रकरणातील संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. नातेवाईक व मित्रांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून आवश्यक वस्तू हस्तगत केल्या आहेत.









