मेष
जे लोक नोकरी करत आहेत किंवा जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्याकरता येणारा आठवडा हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काही अडचणी जरी आल्या तरी त्यातून मार्ग निघेल. कौटुंबिक समाधानाच्या दृष्टीनेदेखील हा आठवडा चांगला असेल. मंगल कार्यामध्ये भाग घ्याल. प्रवासाचे योग आहेत. अपेक्षित बातमी कळेल.
तपकिरी कवडी जवळ ठेवा
वृषभ
कोणत्याही कारणाने कामात केलेली कसूर किंवा आळस हा भविष्याच्या दृष्टीने त्रासदायक करू शकतो. त्यामुळे अंगावर पडलेली कुठलीही जबाबदारी न झटकता किंवा दुसऱ्यांवर न टाकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात असलेल्या ताण तणावावरती समजुतीने मार्ग काढाल. दुसऱ्याला आर्थिक मदत करावी लागेल.
सुगंधी पांढरे फुल जवळ ठेवा
मिथुन
कामाच्या ठिकाणी तुमच्यामागे तुमच्या बाबतीत चुकीचे समज पसरवण्याचे काम जे लोक करत आहेत, त्यांच्या बाबतीत माहिती मिळाल्याने तुम्ही सावध व्हाल. कामाचा बोजा जरी जास्त नसला तरी मानसिक ताणतणावाची स्थिती जाणवण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या विचित्र वागण्यामुळे तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो.
विहिरीत एक चमचा दूध टाकावे
कर्क
एखाद्या मंगल कार्याच्या तयारीला लागला असाल तर त्या कामाला वेग येईल. नवीन ओळखी होतील. व्यावसायिकांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. काही जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा, यश मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कोणालाही उधारी देण्याच्या भानगडीत पडू नका. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे.
दिव्यांगांना आर्थिक मदत करा
सिंह
या आठवड्यात थोडा निवांत वेळ मिळण्याची शक्यता आहे. हा वेळ तुमच्या कुटुंबीयांसोबत किंवा प्रियजनांसोबत घालवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी आपण बरे आणि आपले काम बरे हे धोरण ठेवले तरच छोटे मोठे वाद कळतील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत छोटी ट्रिप करून याल.
मुंग्यांना साखर घालावी
कन्या
पेराल ते उगवेल, हा निसर्गाचा न्याय आहे. तुम्हाला पूर्वी त्रास दिलेल्या लोकांना त्यांच्या कृतीचा पश्चाताप होऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटेल. तसेच अशा व्यक्तींच्या हट्टीपणाचा त्रास होईल. या आठवड्यात तेच तेच करण्याचा किंवा रुटीनचा कंटाळा येऊन काहीतरी वेगळे करावे, असे वाटू शकते.
उशीखाली लोखंडी चावी ठेवावी
तूळ
या आठवड्यामध्ये बऱ्याच नवीन गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. एक प्रकारचे समाधान तुमच्या चेहऱ्यावरती असेल. दुसऱ्याला मदत करण्याची संधी प्राप्त होईल. तब्येतीच्या तक्रारी कमी झाल्यामुळे मानसिक ताण कमी व्हायला मदत होईल. कामाच्या ठिकाणी आपण करत असलेल्या कामाबद्दल कुठेही वाच्यता करू नका.
पाच पिवळ्या कवड्या जवळ ठेवाव्या
वृश्चिक
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना या आठवड्यात काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. मनाप्रमाणे कामाचा मोबदला न मिळाल्याने कदाचित मन निराश होण्याची शक्यता आहे. मित्रांची चांगली साथ मिळेल. त्यांच्यासोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती कळल्याने उत्साहित व्हाल.
पिंपळाचे पान जवळ ठेवा
धनु
हा आठवडा संमिश्र घटनांचा अनुभव मिळणारा असू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या चांगल्या यशामुळे मन आनंदित होईल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढल्याने इतरांची मदत घ्यावी लागू शकते. वैवाहिक जोडीदाराबरोबर असलेले वाद इतरांच्या कानी पडू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. मार्गातले अडथळे दूर होतील.
पिवळा रुमाल जवळ ठेवा
मकर
मुलांच्याकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढल्याने थोडी दमछाक होऊ शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ऑफिसमध्ये एका जास्त ओळख नसलेल्या माणसाचा सल्ला फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.
वासराच्या पायाखालील माती जवळ ठेवा
कुंभ
या आठवड्यात काहीही करून स्वत:च्या अहंकारावर नियंत्रण ठेवायला शिका. घरात किंवा कामाच्या ठिकाणी ‘मी’ पणा दाखवल्यास, मानहानी होण्याची शक्यता आहे. पोकळ आत्मविश्वास घातक ठरू शकतो. पैशांच्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराची चांगली साथ मिळेल. तब्येत सांभाळावी लागेल.
मंदिरात बदाम दान द्या
मीन
एखाद्या मोठ्या समारंभाकरता किंवा मंगल कार्याकरता खर्च होऊ शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असेल. अति धार्मिकपणा काही ठिकाणी अडचणी निर्माण करू शकतो. या आठवड्यात जितके प्रॅक्टिकल राहता येईल, तितके रहा. एखाद्याच्या मदतीला धावून जाण्यापूर्वी ती व्यक्ती योग्य आहे का, याचा विचार करा.
कुत्र्यांना खाणे घाला
काही वेळेला घरात मंगल प्रसंग घडल्यानंतर बऱ्याच अडचणी येतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत तरी बिघडते, कामे सुटतात, घरात भांडणे होतात इत्यादी. अशावेळी एका तमालपत्रावरती शुद्ध भीमसेनी कापूर घेऊन तो घरात सगळीकडे फिरवून जाळावा. उरलेली राख एखाद्या झाडाखाली टाकून द्यावी. शनिवारी हा उपाय करावा.









