रत्नागिरी :
‘हुरा रे हुरा…..आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे….होलयो’ असा फाकांतून जयजयकार करत डोळ्यांचे पारणे फेडणारा श्री देव भैरीबुवाची होळी उत्सवाचा सोहळा शुक्रवारी सायंकाळी झाडगांव सहाणेवर मोठ्या उत्साहात पार पडला. श्री भैरीचा जयजयकार करताच अंगात बळ निर्माण होत होते आणि गावकऱ्यांच्या एकोप्याचे दर्शन घडते. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाची होळी मोठ्या दिमाखात उभी राहिली. हा सोहळा अनुभवण्यासाठी बारा वाड्यांतील ग्रामस्थांसह साऱ्या रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती.
यंदा श्री भैरीबुवाची पालखी झाडगांव येथील दीपक गावडे यांच्या कंपाऊंडमधून होळी घेऊन झाडगांव सहाणेजवळ आली. याठिकाणी ढोलताशांच्या गजरात होळी उभी करण्याचा दिमाखदार सोहोळा पार पडला. सुरमाडाची जड होळी उभी करताना समतोल साधण्यासाठी होळीच्या चार दिशांना दोर बांधण्यात आले होते. तसेच उभी करण्यासाठी मोठ्या लाकडांच्या कैच्या लावण्यात आल्या होत्या. होळी उभी करण्यासाठी हळुहळु गावकऱ्यांचा जोर वाढू लागला. ढोलताशांच्या गजरामुळे जणू अंगात जोश निर्माण होत होता. भैरीबुवाचा जयजयकार करत होळी उभी करण्यासाठी सर्वांचे लक्ष होळीकडे केंद्रीत झाले होते अन् भैरीबुवाची होळी दिमाखात उभी राहिली. अक्षरश: श्वास रोखायला लावणारा हा सोहळा होता.
दरम्यान फाल्गुन पौर्णिमेला गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता श्रीदेव भैरीबुवाच्या प्रांगणात सडामिऱ्या येथील श्री नवलाई–पावणाई आणि जाकिमिऱ्या–अलावा येथील श्री नवलाई–पावणाई या दोन पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा पार पडला. प्रतिवर्षीप्रमाणे हा सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बारा वाड्यांतील ग्रामस्थ युवा, महिलावर्गाने श्री भैरीच्या प्रांगणात अलोट गर्दी केली होती. श्री देव भैरीबुवाची पालखी 15 ते 18 मार्च सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल.
19 मार्च रोजी फाल्गुन पंचमा रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी दुपारी 1 वाजता सहाणेवरून उठेल व पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्र सलामी घेवून झाडगाव श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून झाडगाव नाक्यावऊन पुढे शहर प्रदक्षिणेला निघेल. रात्री 11.30 पर्यत श्री देव भैरी मंदिर प्रांगणात येईल. त्यानंतर रात्रौ. 12 वा. पालखी श्री देव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल. नंतर धुपारत व गावाचे गाऱ्हाणे होऊन शिमगा उत्सवाची सांगता होणार आहे.








