नवी दिल्ली
यावर्षी आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा होणार असून या प्रमुख स्पर्धांसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने आशियाई स्पर्धेसाठी गुरुवारी भारतीय बॅडमिंटन संघाची घोषणा केली. यामध्ये 14 वर्षीय युवा बॅडमिंटनपटू उन्नती हुडाचा समावेश करण्यात आला आहे.
येथील इंदिरा गांधीच्या स्टेडियमच्या संकुलात आशियाई स्पर्धेसाठी गेले सहा दिवस अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू तसेच दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. दरम्यान लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सायना नेहवालला या संघामध्ये स्थान मिळू शकले नाही. विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेते लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान तर आशियाई क्रीडा स्पर्धा 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान चीनमधील हांगझोयु शहरामध्ये खेळविली जाणार आहे.
2022 च्या बॅडमिंटन हंगामामध्ये आणखी तीन प्रमुख स्पर्धा होणार आहेत. वरिष्ठांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने 20 पुरुष आणि 20 महिला असे एकूण 40 बॅडमिंटनपटूंची निवड केली आहे. 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोर गटासाठी हे शिबिर घेण्यात येईल. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, सात्विक साईराज, चिराग शेट्टी, बी. सुमित रेड्डी यांचा पुरुष विभागात तर पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, त्रिशा जॉली, पी. गायत्री, अश्विनी पोनाप्पा यांचा महिला विभागात समावेश राहिल. आशियाई स्पर्धा तसेच थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेसाठी 10 सदस्यांचा भारतीय महिला संघ निवडण्यात आला असून यामध्ये पी. व्ही. सिंधू, कश्यप, चलिहा, उन्नती हुडा यांच्यासह दुहेरीतील तीन जोडय़ांची निवड करण्यात आली आहे. त्रिशा जॉली-पी. गायत्री, एन. सिक्की रेड्डी-अश्विनी पोनाप्पा, तनिषा क्रेस्टो-श्रुती मिश्रा, पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, श्रीकांत त्याचप्रमाणे पुरुष दुहेरीतील जोडी सात्विक साईराज आणि शेट्टी यांनी बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात पहिल्या 15 क्रमांकात स्थान मिळविल्याने त्यांना थेट प्रवेश मिळणार आहे. अलीकडेच चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या एच. एस. प्रणॉय आणि पी. राजवत यांचा भारतीय पुरुष संघात समाविष्ट करण्यात आला आहे. आशियाई स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पुरुषांच्या 10 सदस्यांमध्ये राजवतचा समावेश आहे. तसेच तो थॉमस चषक स्पर्धेत खेळणार असून या स्पर्धेत लक्ष्य सेन, श्रीकांत आणि प्रणॉय भारताचे प्रतिनिधीत्व करतील. थॉमस-उबेर चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा बँकाँकमध्ये 8 ते 15 म दरम्यान खेळविली जाणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा- भारतीय संघ- पुरुष- लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, सात्विक साईराज, चिराग शेट्टी, बी. सुमित रेड्डी, महिला- पी. व्ही. सिंधू, आकर्षी काश्यप, ट्रेसा जॉली, पी. गायत्री आणि अश्विनी पोनाप्पा.
आशियाई स्पर्धा, थॉमस-उबेर चषक संघ-पुरुष- लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, पी. राजवत, चिराग शेट्टी, सात्विक साईराज, ध्रुव कपिला, एम. आर. अर्जुन, विष्णुवर्धन गौड, कृष्णप्रसाद गरिगा, महिला-पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, अस्मिता चलिहा, उन्नती हुडा, त्रिशा जॉली, पी. गायत्री., एन. सिक्की रेड्डी, अश्विनी पोनाप्पा, तनिषा क्रेस्टो आणि श्रुती मिश्रा.









