न्हावेली / वार्ताहर
माऊली माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी चैतन्या मिलिंद गावकर, तेजस ज्ञानेश्वर परब व शिक्षक पांडुरंग गोपाळ काकतकर यांचा अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गतर्फे शिवउद्यान,सावंतवाडी येथे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण विभाग सिंधुदुर्ग आयोजित इस्रो बेंगळुरू येथील वैज्ञानिक सहलीसाठी कुमारी चैतन्या मिलिंद गावकर हिची निवड झाल्याबद्दल तसेच तेजस ज्ञानेश्वर परब याची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल गौरविण्यात आले.
पांडुरंग काकतकर यांचा विशेष सत्कार
शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंतांच्या सत्कार समारंभात सोनुर्ली विद्यालयाचे महाराष्ट्र् शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील विज्ञान शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग गोपाळ काकतकर यांचा शाल,श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आय.आय.टी. गुवाहाटी (आसाम) या ठिकाणी नुकत्याच झालेल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करुन जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.काकतकर हे माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे गेली अठ्ठावीस वर्षे अध्यापनाचे कार्य करत असून त्यांची आजतागायत राज्य तसेच राष्ट्रिय स्तरावर विविध विज्ञान विषय उपक्रमांसाठी निवड झालेली असून त्यात आयसर, यशदा, एस.सी.ई.आर.टी. पुणे, नेहरु विज्ञान केंद्र मुंबई, एस.आय.एस.ई.नागपूर, सी.सी.आर.टी.दिल्ली,हैद्राबाद,आय.आय.एस.एफ.फरीदाबाद,नॅशनल सायन्स काँग्रेस कोलकाता,आर.आय.ई.भोपाळ,आगस्त्या सायन्स सेंटर कूप्पम, बेंगळुरू, आयसर तिरुवनंतपुरम या संस्थांचा समावेश आहे. जिल्हयात विज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ व शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, राज्यस्तरीय विज्ञान नाटय महोत्सव,राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा यांच्या आयोजनात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यांनी अपूर्व विज्ञान मेळावा, विज्ञान जत्रा, ई-लर्निग, करिअर गाईडन्स यांसारख्या उपक्रमांबरोबरच आपल्या विद्यालयात आमदार,खासदार निधीतून तसेच लोकवर्गणीतून शैक्षणीक विकास निधीसाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे. 63 मुन्स फाऊंडेशनकडून प्रयोग शाळा,आय. सी. टी. लॅब निर्मितीसाठी यशस्वी पाठपुरावा,कोरोना काळात विद्यार्थांना विज्ञान विषयाच्या मार्गदर्शनासाठी 8 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान अभ्यासक्रमाचे व्हिडिओज निर्मिती केले. त्याचे यूट्यूब चॅनलवरुन प्रसारीत तसेच सी. डी.च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी उपलब्ध केले.या सर्व उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना 2017 चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले असून त्यांची आकाशवाणी तसेच दूरदर्शनवर मुलाखतही प्रसिद्ध झालेली आहे .त्यांच्या कार्याचा गौरव अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडूनही झालेला आहे.
सदर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी,मराठा महासंघाचे नेते ॲड.श्रीनिवास गवस,ॲड.संदीप निंबाळकर,ॲड.शामराव सावंत अखिल भारतीय मराठा महासंघाचे व्यापारी सेलचे जिल्हा अध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, उदय भोसले, अपर्णा कोठावळे,प्रशांत कोठावळे, तानाजी पालव, संजय सावंत,नंदू गावडे, अभिजित सावंत ,दिगंबर नाईक ,भरत गावडे,पदाधिकारी, तेजस व चैतन्याचे आई बाबा आणि तसेच मोठया संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.









