वृत्तसंस्था / दुबई
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने आयसीसीतर्फे घोषित करण्यात आलेल्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थानावर झेप घेतली आहे.
या अग्रस्थानासाठी प्रामुख्याने स्मृती मानधना आणि द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूलव्हर्ट यांच्यात चढाओढ होती. 2019 नंतर प्रथमच स्मृती मानधनाने फलंदाजांच्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थान मिळविले आहे. द. आफ्रिकेच्या वूलव्हर्टने 19 मानांकन गुण जमविले. वनडे महिलांच्या फलंदाजांच्या मानांकन यादीत मानधना 727 मानांकन गुणासह पहिल्या तर इंग्लंडची कर्णधार नाथाली सिव्हेर ब्रंट 719 मानांकन गुणासह दुसऱ्या तर द. आफ्रिकेची वूलव्हर्ट 719 मानांकन गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रंटने वूलव्हर्टपेक्षा काही अंशाने आघाडी घेतल्याने ती दुसऱ्या स्थानावर आहे. या मानांकन यादीत जेमीमा रॉड्रिग्ज 14 व्या तर कर्णधार हरमनप्रित कौर 15 व्या स्थानावर आहे.
चालु महिन्याच्या अखेरीस भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका तसेच तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. कोलंबोत अलिकडेच झालेल्या महिलांच्या तिरंगी मालिकेत स्मृती मानधनाने अंतिम सामन्यात लंकेविरुद्ध शानदार शतक झळकविले होते. आयसीसीच्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत मानधना चौथ्या स्थानावर आहे.









