कांगोच्या अध्यक्षांनी फ्रान्सला सुनावले
वृत्तसंस्था/ किंशासा
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दोन देशांच्या नेत्यांदरम्यान वादविवाद होणे नवी गोष्ट नाही. परंतु कांगो प्रजासत्ताक आणि फ्रान्सच्या अध्यक्षांदरम्यान एका पत्रकार परिषदेत वाद झाला आहे. आमचा सन्मान करा आणि आमच्याकडे ज्या नजरेने पाहिले जाते, तसे पाहू नका, आमच्यासोबत पितृसत्तात्मक पद्धतीने वागू नका. प्रँकफ्रीक आता अस्तित्वात नाही असे कांगो प्रजासत्ताकचे अध्यक्ष फेलिक्स त्सेसेकेदी यांनी पत्रकार परिषदेत मॅक्रॉन यांना उद्देशून म्हटले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रँकफ्रीकचा अर्थ फ्रान्स आणि बेल्जियमच्या आफ्रिकेतील पूर्वाश्रमीच्या वसाहती असा होतो.
या पत्रकार परिषदेत दोन्ही देशांच्या प्रमुखांदरम्यान तणावपूर्ण क्षण दिसून आला. आफ्रिकेतील अनेक देशांवर फ्रान्सचे राज्य होते. फ्रान्स आणि पाश्चिमात्य देशांनी आफ्रिकेबद्दलचा स्वतःचे शाही वर्तन सोडून द्यावे. आमचा सन्मान करून आमच्याकडे वेगळय़ा दृष्टीकोनातून पहा. आमचा खरा साथीदार मानावे असे त्सेसेकेदी यांनी मॅक्रॉन यांना सुनावले आहे.
समानतेवर आधारित धोरण
प्रँकफ्रीक आता अस्तित्वात नाही. यामुळे समानतेवर आधारित धोरण तयार केले जावे. कांगो प्रजासत्ताकच्या गोमा क्षेत्रात सुरू असलेल्या हिंसक संघर्षाकरता रवांडावर निर्बंध लादले जावेत अशी मागणी त्सेसेकदी यांनी मॅक्रॉन यांच्याकडे केली आहे. मॅक्रॉन हे कांगो प्रजासत्ताकची राजधानी किंशासा येथे आयोजित आर्थिक परिषदेत सामील झाले होते.
मॅक्रॉन यांचे प्रत्युत्तर
फ्रान्स आफ्रिकेतील स्वतःच्या नियमित सैन्यतळांचे संचालन बंद करणार आहे. याऐवजी अकॅडमीची स्थापना करण्यात येणार आहे. जर एखादा पत्रकार काही लिहित असले तर ती फ्रान्सची भूमिका असत नाही. याचमुळे दोन्ही गोष्टींना एकत्र जोडले जाऊ नये असे मॅक्रॉन यांनी त्सेसेकदी यांना उद्देशून म्हटले. यावर त्सेसेकदी यांनी फ्रान्सचे माजी विदेशमंत्री ले ड्रियन यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालो असल्याचे स्पष्टीकरण दिले.









