मोठय़ा प्रमाणात पलायन ः 1.6 टक्क्यांनी कमी झाली लोकसंख्या
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
कोरोना संकटातील कठोर बंधने आणि क्षी जिनपिंग यांच्या शासनातील चिनी धोरणांमुळे हाँगकाँगमध्ये पलायन सुरू झाले आहे. यामुळे हाँगकाँगची लोकसंख्या वेगाने कमी होत आहे. येथे वर्षभरात सुमारे 1.12 लाख लोकांनी पलायन केले आहे. तर एक वर्षापूर्वी हाँगकाँग सोडणाऱयांची संख्या 89,200 इतकी होती.
पलायन करणाऱयांमध्ये स्थायी रहिवासी देखील सामील आहेत. त्यांच्यासोबत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अन्य स्थलांतरितही शहर सोडत आहेत. मागील एक वर्षात लोकसंख्येत 1.6 टक्क्यांची घट होत 72.9 लाखांवर आकडा आला आहे. एक वर्षापूर्वी येथील लोकसंख्या 74.1 लाख होती. 1961 नंतर लोकसंख्येतील ही सर्वात मोठी घसरण आहे. लोकसंख्येतील ही घट धोरणांमुळे नव्हे तर नैसर्गिक असल्याचा दावा कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थक अधिकाऱयांचा आहे.
मागील काही वर्षांमध्ये सामाजिक उलथापालथ गतिमान झाली आहे. तर लोकशाही समर्थक आंदोलनावरील कठोर कारवाईनंतर रहिवाशांचे पलायन वेगाने वाढले आहे. चीनच्या धर्तीवर हाँगकाँगमध्ये कठोर प्रवास निर्बंध लागू करण्यात आले होते. उर्वरित जगातील लॉकडाउन संपलेले असतानाही हाँगकाँगमध्ये लॉकडाउन लागू होते. कैदेसारख्या स्थितीमुळे बहुतांश उद्योग बंद होण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत.
हाँगकाँगमध्ये सरकारविरोधी निदर्शनानंतर लोकशाही समर्थकांचा छळ सुरू झाला. अशा लोकांसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया समवेत अनेक देशांनी व्हिसा प्रदान केले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी तैवानमध्ये आश्रय घेतला आहे.









