सरकारी अधिकारी-धनिक लक्ष्य : सोशल मीडिया अन् तंत्रज्ञानाचा गैरवापर, अश्लीलतेच्या बाजारात कोण खरे अन् कोण खोटे?
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावात सध्या हनीट्रपच्या प्रकाराची चर्चा गल्लोगल्ली रंगली आहे. बेळगाव येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. पाच-सहा दिवसांत दाखल झालेल्या परस्परविरोधी दोन तक्रारी, त्या तक्रारींची चौकशी, पत्रकार परिषदेत एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप आदींमुळे सामान्य जनतेची मती गुंग झाली आहे. अनेक सरकारी अधिकारी क्षणिक सुखापायी हनीट्रपच्या जाळय़ात अडकल्याचीही माहिती मिळाली आहे.
कथित हनीट्रप प्रकरणाची चौकशी सोमवारपासून सुरू होणार आहे. एपीएमसी पोलिसांनी संबंधित महिलेला नोटीस दिली आहे. आरोप-प्रत्यारोप, फिर्याद-प्रतिफिर्याद काहीही असले तरी सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले या प्रकरणातील तरुणीचे व्हिडिओ आणि छायाचित्रांनी समाजमन अस्वस्थ झाले आहे.
फलोत्पादन विभागाचे अधिकारी राजकुमार टाकळे यांनी 18 जुलै 2022 रोजी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. चन्नपट्टण, जि. रामनगर येथील एक तरुणी व तिच्या मित्राविरुद्ध या दोघा जणांवर भादंवि 384, 448, 504, 506, सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पैसे उकळण्यासाठी आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा आरोप या अधिकाऱयाने केला आहे.
यापाठोपाठ शनिवार दि. 23 जुलै रोजी एका तरुणीने राजकुमार टाकळे याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. भादंवि 342, 354, 366, 376 (2), 312, 201, 420, 504, 506, 509 व माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री हे तपास करीत आहेत.
हनीट्रप कोणी कोणासाठी रचला? त्यात नेमके कोण अडकले? शिकारीच शिकार बनला का? या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी लागणार आहे. कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील हे मंत्री असताना त्यांच्या अधिकाराखाली विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून राजकुमार टाकळे कार्यरत होते. त्यावेळी चन्नपट्टण येथील तरुणीचा परिचय झाला. त्यानंतरच्या काळात हा सारा प्रकार घडला आहे.
हनीट्रपची अनेक प्रकरणे
पैशासाठी त्या तरुणीने आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप राजकुमार यांनी केला आहे. तर आपले खासगी क्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून राजकुमार यांनी आपली बदनामी केली आहे, असा आरोप त्या तरुणीने केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हनीट्रपची अशी अनेक प्रकरणे बेळगावात घडली आहेत. सायबर क्राईम विभागात तक्रार करणाऱयांची संख्या काही कमी नाही.
सर्व प्रकारांचे मूळ पैसाच
बेळगाव शहर व जिल्हय़ात सरकारी अधिकारी व धनिकांना हनीट्रपच्या जाळय़ात अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱया अनेक टोळय़ा कार्यरत आहेत. या टोळय़ांनी विणलेल्या जाळय़ात अडकणारे अधिकारी या जाळय़ातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतात. या सर्व प्रकारांचे मूळ पैसा हेच असतो. लाखो रुपये खंडणी घेऊन व्यवहार संपविला जातो. काही वेळा एकांतातील व्हिडिओ व छायाचित्रे दाखवत वारंवार सावजाकडून पैसा उकळला जातो.
बेअब्रू होण्याच्या भीतीने अनेक प्रकरणांत एफआयआर दाखल केले जात नाही. शक्मयतो पैसे देऊन व्यवहार मिटविण्यावरच भर दिला जातो. बेळगाव-चिकोडी परिसरात तर या टोळीतील गुन्हेगारांनी असे अनेक प्रकार केले आहेत. मध्यंतरी वेगवेगळय़ा अधिकाऱयांचे विवस्त्र व्हिडिओ व्हायरल झाले होते. अशाच एका टोळीने मठाधीशांनाही अडचणीत आणले होते.
झटपट श्रीमंतीसाठी राजमार्ग
एखादे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची चर्चा होते. एफआयआर दाखल होते, चौकशी होते, काही महिन्यांनंतर पुन्हा हे प्रकार सुरू होतात. हनीट्रप हा झटपट श्रीमंत होण्याचा अनेकांसाठी राजमार्ग ठरला आहे. काही सुंदर तरुणींचा यासाठी वापर केला जातो. सरकारी अधिकारी किंवा धनिकांची यादी काढून त्यांना मिस्डकॉल दिला जातो. हा नंबर कोणाचा आहे? हे तपासण्यासाठी जर त्यांनी त्यावर पुन्हा फोन केला तर हनीट्रपचा पहिला टप्पा सुरू होतो. यासाठी नियुक्त केलेल्या तरुणी सावजाशी सलगीने बोलतात. त्यामुळे सावज अत्यंत सहजपणे त्यांच्या जाळय़ात अडकतो व नंतर त्याची मोठी फसवणूक होते.
तंत्रज्ञानाच्या मदतीनेच असे प्रकार सुरू आहेत. जसे हनीट्रपसाठी लपविलेला कॅमेरा, मोबाईल कॅमेऱयाचा वापर होतो तसेच लग्न न ठरणाऱयांसाठी वधूचा प्रस्ताव देऊन सुंदर तरुणींची भेट घडविली जाते. त्यानंतर त्यांचे लग्नही लावून दिले जाते. मात्र, पंधरा दिवसांतच ही नववधू आपल्या नवऱयाकडील मिळेल तो ऐवज घेऊन पोबारा करते आणि त्यानंतर शोध सुरू होतो तो दुसऱया सावजाचा.
‘तरुण भारत’ने केली होती जागृती!
‘सावधानी बाळगा अन्यथा सर्वस्व गमवाल’ या मथळय़ाखाली 22 मार्च 2021 रोजी ‘तरुण भारत’ने हनीट्रपचे प्रकार कसे घडतात, याविषयी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून जागृती केली होती. हनीट्रपसाठी फेसबुकचा वापर कसा होतो? याचीही माहिती देण्यात आली होती.
अशी असते कार्यपद्धती!
गेल्या एक-दोन वर्षांपासून फेसबुकवरही असे प्रकार सुरू आहेत. आधी एखाद्या तरुणीची प्रेंडरिक्वेस्ट येते. ती स्वीकारल्यानंतर दहा-पंधरा मिनिटांचे चॅटिंग होते. तुम्ही कोण आहात, कोठे राहता, काम काय करता? आदी चौकशा झाल्यानंतर एक मेसेज येतो. नग्न व्हिडिओ करणार आहे, पाहण्याची तयारी आहे का? अशी विचारणा केली जाते. सावजाने तयारी दर्शविली तर व्हिडिओ कॉल येतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने सावजालाही नग्न केले जाते. त्याचा व्हिडिओ त्याला पाठवून धमकावले जाते. पैसे दे नाही तर तुझ्या कॉन्टॅक्टमधील सर्वांना हा व्हिडिओ पाठवू. बेळगाव शहरातील अनेक तरुण या नग्न व्हिडिओ कॉलच्या मोहात अडकून फशी पडले आहेत.