चीनमध्ये एका इन्फ्लुएंसरने स्वयंपाक, सफाई करणे आणि त्याच्यासोबत डेटवर जाण्यासाठी ह्युमनाइड रोबोट भाडेतत्वावर घेतला आहे. याचे एक दिवसाचे भाडे कळल्यावर धक्काच बसेल. एका रोबोटला स्वत:चा सहाय्यक करण्यासाठी एक दिवसाचे भाडे 1400 डॉलर्स प्रतिदिन म्हणजेच 1.20 लाख रुपये आहे. या घटनेने ऑनलाइन लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविलेला 25 वर्षीय झांग जेनयुआन 2022 मध्ये एका डेटिंग रियलिटी शोद्वारे प्रसिद्धी मिळविली होती. तो आता स्वत:च्या ट्रॅव्हलॉगला सोशल मीडियावर शेअर करतो, जेथे त्याचे 1.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
13 मार्च रोजी झांगने एका ह्युमनॉइड रोबोटसोबत पूर्ण दिवस घालविला आहे. त्याच्या या संबंधीच्या पोस्टला 40 हजारांहून अधिक लाइक्स प्राप्त झाल्या. त्याने चीनमधील सर्वात अत्याधुनिक ह्युमनॉइड रोबोट्सपैकी एक जी1 ला एक दिवसासाठी भाडेतत्वार घेण्यासाठी 10 हजार युआन खर्च केले.
जी1 ला मागील वर्षी पूर्व चीनच्या हांग्जो येथील कंपनी युनिट्री रोबोटिक्सकडून जारी करण्यात आले होते. 127 सेंटीमीटर लंब आणि 35 किलोग्रॅम वजनाचा हा रोबोट चपळ असून मार्शल आर्ट देखील करू शकतो.
चीनमध्ये मिळतात भाड्याने रोबोट
चीनच्या सेकंड-हँड ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या अनेक युजर्सनी जी1 ची खरेदी केली आणि त्याची भाडेतत्वावर सेवा प्रदान केली. याचे भाडे एक लाखापासून 1.8 लाख रुपये प्रतिदिन आहे. रोबोट्सना माणसांसोबत राहताना दाखविणाऱ्या विज्ञानकथा चित्रपटांनी प्रेरित होत झांगने आपण अशी जीवनशैली स्वीकारू शकतो का हे पाहण्यासाठी जी-1 भाडेतत्वावर मिळविण्याचा निर्णय घेतला होता.
संभाषण करणारा रोबोट
झांगने प्रसारित केलेल्या व्हिडिओत जी-1 त्याच्या ऑर्डर्स पाळत असताना दिसून येतो. रोबोट उत्साहात त्याला अभिवादनही करत होता. तसेच तुम्हाला भेटून आनंद झाल्याचे रोबोट म्हणत असल्याचे यात दिसून येते. यानंतर रोबोट स्वत:ची पात्रता म्हणजेच स्वयंपाक, सफाई करणे तसेच भोजन अन् खरेदीसाठी मदत करण्यास सक्षम असल्याचे सांगतो. झांगने रोबोटला मला ओळखतोस का अशी विचारणा केली. यावर रोबोटने त्याचा पेशा आणि फॉलोअर्सची संख्या देखील सांगून टाकली. तसेच त्याच्या कामाची प्रशंसा केली. झांगने जी1 ला घराबाहेर फिरविले आणि त्याचा हात पकडून रस्त्यावर हिंडला. रोबोट कुशलपणे अडथळ्यांपासून वाचतो आणि धावू देखील शकतो. झांगने जी1 ला नृत्य करण्यास सांगितल्यावर रोबोट नृत्य करत होता.









