शेंगदाणा आणि गुळाची चिक्की सर्वांनाच आवडते.हिवाळ्यातदेखील गूळआणि गुळाचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.लाडू ,गजक आणि गुळाची पापडी ,पोळी किंवा चिक्कीही लोकांना हिवाळयात खायला आवडते. त्यामुळेच तुम्ही शेंगदाणा आणि गुळाची चिक्कीही बनवून खाऊ शकता.यासाठी ही चिक्की कशी बनवायची हे सांगणार आहोत.शिवाय ही चिक्की झटपट देखील बनते.
साहित्य
शेंगदाणे -एक वाटी
गुळाचे छोटे तुकडे -एक वाटी
तूप -दोन चमचे
कृती
एक भांडे घ्या आणि त्यात फक्त शेंगदाणे भाजून घ्या. नंतर शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यावर त्याची सर्व साले काढून घ्या. नंतर एका भांड्यात किंवा पातेल्यात गूळ आणि तूप टाकून नीट मिक्स करून घ्या. आता गूळ सतत ढवळत राहा आणि मंद आचेवर वितळू द्या.गुळाचे मोठे तुकडे असल्यास चमच्याने फोडून घ्या आणि ढवळत राहा. सर्व गूळ वितळल्यावर पुन्हा २ मिनिटे ढवळत राहा.चिक्कीसाठी गुळाचे मिश्रण व्यवस्थित बनले आहे की नाही हे तपासण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात वितळलेल्या गुळाचे एक ते दोन थेंब टाका.गूळ चिक्कीप्रमाणे घट्ट झाला तर समजा पाक तयार आहे. असे होत नसेल तर गूळ आणखी काही वेळ परता. आता गुळात शेंगदाणे घालून मिक्स करा. एका प्लेटमध्ये थोडं तूप टाकून ते छान पसरून घ्या. प्लेटमध्ये गुळाचे मिश्रण ओतून पातळ पसरवा आणि चाकूने त्याचे काप करा.कारण मिश्रण थंड झाल्यावर चिक्कीचे काप करता येत नाहीत.चवीष्ट आणि पौष्टिक असणारी चिक्की तुम्हीदेखील एकदा नक्की ट्राय करा.