भारताची सर्वात मोठी विमानवाहू नौका, नौदलाचे ध्वजचिन्ह शिवाजी महाराजांना समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
कोच्ची / वृत्तसंस्था
भारताची स्वदेशनिर्मित आणि आतापर्यंतची सर्वात मोठी विमानवाहू नौका ‘विक्रांत’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या नौकेच्या समावेशामुळे नौदलाचे सामर्थ्य मोठय़ा प्रमाणात वाढणार असून त्याची मारक क्षमताही अजोड बनणार आहे. विक्रांतमुळे भारताची सागरी सुरक्षा व्यवस्था बळकट होणार असून हा भारताच्या सागरी शत्रूंना इशाराचा मानला जात आहे.
केरळमदील कोच्ची येथील नौदलाच्या तळावर या विमानवाहू नौकेचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी झालेल्या या शानदार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौका नौदलाच्या सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथसिंग, नौदल प्रमुख, इतर केंद्रीय मंत्री, केरळचे मुख्यमंत्री विजयन आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

पूर्वीच्या विक्रांतवरुन नाव
1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पराक्रम गाजविलेल्या ‘विक्रांत’ या युद्धनौकेवरुनच या नौकेचेही नामकरण विक्रांत असे करण्यात आले आहे. एक प्रकारे ही पूर्वीच्या विक्रांत नौकेची स्मृती जागविण्याची कृती आहे, असे मानले जात आहे. पूर्वीची विक्रांत ही भारताची प्रथम विमानवाहू नौका होती. 31 जानेवारी 1997 या दिवशी त्या विक्रांत नौकेला निवृत्त करण्यात आले होते.
विकसीत होण्याच्या दिशेने…
नव्या विक्रांतचे जलावतरण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना उद्देशून भाषण केले. आतापर्यंत विमानवाहू नौका बांधणे हा केवळ विकसीत देशांचा विशेषाधिकार होता. मात्र, भारताने संपूर्णतः स्वदेशात अशा प्रकारच्या नौकेची निर्मिती करुन हा समज मोडीत काढला आहे. एक प्रकारे या नौकेच्या माध्यमातून भारत विकसनशील अवस्थेतून विकसीत देश होण्याच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांपर्यंत नौदलाचे आधुनिकीकरण हा विषय दुर्लक्षित राहिला. तथापी, गेल्या आठ वर्षांमध्ये त्याला चालना मिळाली आहे. नौदलाचे सामर्थ व<ाढविल्याशिवाय देशाची सुरक्षा व्यवस्था परिपूण होऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या क्षेत्रात विषेश पावले उचलली आहेत. संरक्षणावर होणाऱया खर्चात वाढ केली आहे. देशासमोरची सुरक्षा विषयक आव्हाने लक्षात घेऊन सेनादलांचे सामर्थ्य वाढविण्याचा प्रयास वेगाने होत आहे. यापुढेही संरक्षण क्षेत्र प्राधान्याचे क्षेत्र असेल, असे आवेशपूर्ण प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
भक्कम बांधणी
विक्रांतच्या निर्मितीसाठी 20 हजार कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. यासाठी 26 हजार टन पोलाद उपयोगात आणण्यात आले असून विमानवाहू नौकेसाठी लागणाऱया विशेष पोलादाची निर्मितीही भारतातच ‘स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडिया’कडून करण्यात आली आहे. याकामी या संस्थेला संरक्षण संशोधन आणि विकस संस्थेचे (डीआरडीओ) साहाय्य लाभले आहे. या नौकेवर एकाच वेळी 30 युद्धविमाने थांबू शकतात. या नौकेवर मिग 29,केमॉव्ह 31 अलै वॉर्निंग हेलिकॉप्टर्स, एमएच 60 आर मल्टिरोल हेलिकॉप्टर्स, भारत निर्मित हलकी मल्टीरोल हेलिकॉप्टर्स आणि नौदलाची हलकी लढावू विमाने राहू शकतात.
सर्वात वजनदार
या नौकेचे वजन 42,800 हजार टन इतके असून ती भारताची आतापर्यंतची सर्वात वजनदार विमानवाहू नौका आहे. अगदी थोडकी धाव घेऊन विमाने झेपावण्याची सोय यावर आहे. तसेच थेट आकाशात विमान झेपावण्याची सोयही (स्काय जंप) आहे. तसेच उतरलेले विमान अगदी कमी अंतरात थांबविण्याची सोयही आहे. ही नौका सर्वार्थाने सामर्थ्यवान आहे, अशी माहिती देण्यात आली.
निर्मिती 2005 पासून
कोच्ची येथील नौदलाच्या कार्यशाळेत या नौकेच्या निर्मितीचा प्रारंभ 2005 मध्ये करण्यात आला. फेब्रुवारी 2009 मध्ये नौकेचा पोलादी सांगाडा निर्माण करण्यात आला आणि 2013 मध्ये प्रथम तिचे जलावतरण करण्यात आले. मात्र, आतील शस्त्रास्त्रे आणि इतर पायाभूत सुविधा झाल्यानंतर आता 2 सप्टेंबर 2022 या दिवशी या नौकेचे अधिकृतरित्या उद्घाटन करण्यात आले आहे.
अनेक उपकरणे भारतीय
या नौकेवर विविध उपकरणे आणि साधने असून त्यांच्यापैकी बहुतेक सर्व साधनांची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. त्यामुळे ही नौका स्वदेश निर्मित म्हणून ओळखली जाते. या नौकेवरुन क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक तोफा, मोठय़ा मशिनगन्स इत्यादींचा मारा अचूक लक्ष्यावर केला जाऊ शकतो.
रोजगारनिर्मितीला चालना
या नौकेमुळे केवळ नौदलाचेच सामर्थ्य वाढले आहे असे नव्हे, तर मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मितीही झाली आहे. गेली 17 वर्षे या नौकेची निर्मिती होत होती होती. या काळात नौका निर्मिती करणाऱया 2,000 कर्मचाऱयांना रोजगार मिळाला. तसेच या नौकेवर नौसैनिकांसह एकंदर 13,000 हून अधिक कर्मचाऱयांच्या निवासाची सोय होऊ शकते. या नौकेवरील कक्षांची संख्या 2,200 इतकी आहे. एकंदर या नौकेमुळे रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे.
नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित
विक्रांत उद्घाटनाच्या कार्यक्रमातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नौदलाला नवे ध्वजचिन्हही प्रदान करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदल सामर्थ्याचा विशेषत्वाने उल्लेख करत हे नवे ध्वजचिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याची घोषणा केली. नौदल आजवर आपल्या ध्वजावर ब्रिटीश कालीन चिन्हच उपयोगात आणत होते. मात्र, आता गुलामगिरीच्या या प्रतीकापासूनही भारतीय नौदलाला स्वातंत्र्य मिळाले आहे. नौदलाचा मिळालेले नवे चिन्ह पूर्णतः भारतीय आहे. ब्रिटीशकालीन चिन्ह आता नौदलाच्या ध्वजावरुन हटविण्यात आले आहे. ‘शं नो वरुणः’ हे वेदातील वाक्य या चिन्हावर आहे. पूर्वी हेच वाक्य होते. त्याचे आता पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. तसेच हे चिन्ह शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या आकारात आहे. वेदातील या वाक्याचाअ अर्थ वरुण (सागराची देवता) पवित्र आहे, असा होतो. हे नवे चिन्ह आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाच्या ध्वजावर फडकणार आहे, असे गौरवपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.
मौर्य आणि गुप्त काळातील नौदलाच्या सामर्थ्याचाही त्यांनी गौरवाने उल्लेख केला. तेव्हापासून भारतात बळकट नौदल असण्याची परंपरा अनेक भारतीय राजांनी जपली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय राजांच्या नौदलाची धास्ती वाटत होती. त्यामुळे त्यांनी नवा कायदा आणून भारतीय नौकानयन बंद पाडण्याची व्यवस्था केली. भारतीयांच्या लक्षात ब्रिटीशांची ही कुटील नीती वेळीच आली नाही. त्यामुळे पुढच्या काळात भारताचे नौसामर्थ्य घटत गेले. याचे दुष्परिणाम आपल्याला स्वातंत्र्यानंतरही भोगावे लागले. आता सध्याचे केंद्र सरकार भारतीय नौदलाच्या गतकाळातील वैभवाचे आणि सामर्थ्याचे पुनरुत्थान करण्यासाठी वेगाने प्रयत्न करीत आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
विक्रांत आणि विक्रमादित्य
वजन
विक्रांत- 42,800 टन विक्रमादित्य- 44,500 टन
लांबी
विक्रांत- 262 मीटर विक्रमादित्य- 284 मीटर
रुंदी
विक्रांत- 62 मीटर विक्रमादित्य- 60 मीटर
कार्यकरण क्षमता
विक्रांत- 7,500 नॉटिकल विक्रमादित्य- 7,000 नॉटिकल
मजले
विक्रांत- 22 मजली विक्रमादित्य- 20 मजली
सैनिक क्षमता
विक्रांत- 1,600 नौसैनिक विक्रमादित्य- 1,600 नौसैनिक
बॉयलर्स
विक्रांत- 12 बॉयलर्स विक्रमादित्य- 8 बॉयलर्स
विमान क्षमता
विक्रांत- विविध प्रकारची 30 विक्रमादित्य- विविध प्रकारची 30
खर्च
विक्रांत- 20,000 कोटी विक्रमादित्य- 18,000 कोटी
निर्मिती
विक्रांत- पूर्णतः स्वदेशी विक्रमादित्य- बव्हंशी विदेशी
शस्त्रसंभार
विक्रांत- विक्रमादित्य-
लेसर गायडेड क्षेपणास्त्रे, गायडेड क्षेपणास्त्रे,
नौकाविरोधी क्षेपणास्त्रे, नौकाविरोधी क्षेपणास्त्रे
मोठय़ा मशिनगन्स मशिनगन्स
एअर टू एअर क्षेपणास्त्रे एअर टू एअर क्षेपणास्त्रे
भूमीवरील क्षेपणास्त्रे भूमीवरील क्षेपणास्त्रे









