वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय दौऱयावर असणाऱया ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणास्तव तातडीने मायदेशी परतला आहे. कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असल्याने तो दुसरी कसोटी संपल्यानंतर मायदेशी गेला आहे.
कमिन्सने सिडनीला प्रयाण केले असून उर्वरित दोन कसोटीसाठी तो पुन्हा भारतात परतणार असल्याचे वृत्त एका क्रीडा वाहिनीने दिले आहे. इंदोर व अहमदाबाद येथे तिसरी व चौथी कसोटी होणार आहे. यातील तिसरी कसोटी 1 मार्चपासून इंदोरमध्ये होणार आहे. दुसरी कसोटी तिसऱया दिवशीच समाप्त झाल्याने दोन्ही संघांना दोन दिवसांचा जादा ब्रेक मिळाला आहे. याशिवाय तिसरी कसोटी 1 मार्चपासून होत असल्याने त्यांना आणखी थोडा जादा ब्रेक मिळणार आहे. अहमदाबादमधील चौथी कसोटी 9 मार्चपासून सुरू होईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका होणार असून यातील पहिला सामना 17 मार्चला होणार आहे. कमिन्स तिसऱया कसोटीसाठी वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही तर उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करेल.
पहिल्या दोन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या भेदक फिरकीसमोर साफ ढेपाळला असून मायदेशात त्यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे. ऑस्ट्रेलियाला भारतात 2004 नंतर अद्याप मालिका जिंकता आलेली नसून यावेळी ही कोंडी ते फोडतील असे वाटले होते. पण भारतानेच पहिल्या दोन कसोटी जिंकून त्यांचे मनसुबे उधळून लावत बॉर्डर गावसकर करंडक आपल्याकडेच राखला आहे. ऑस्ट्रेलियाला ही मालिका बरोबरीत सोडविण्याची आशा करता येईल. मात्र यासाठी त्यांना स्पेशल काहीतरी करण्याची गरज लागेल. सध्यातरी ते खचलेले असल्याने त्यांच्याकडून फाईटबॅक होण्याची शक्यता कमीच वाटते.









