युएपीए अंतर्गत अवैध संघटना घोषित
वृत्तसंस्था/ श्रीनगर
फुटिरवादी नेता शब्बीरच्या शाहच्या जम्मू अँड काश्मीर-डेमोक्रेटिक फ्रीडम पार्टीवर (जेकेडीएफपी) केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जेकेडीएफपीला 5 वर्षांसाठी अवैध संघटना घोषित केले आहे. सरकारने युएपीएचे कलम 3 (1) अंतर्गत जेकेडीएफपीला बेकायदेशीर ठरविले आहे. जेकेडीएफपी देशविरोधी कृत्यांमध्ये सामील असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे.
जेकेडीएफपीची स्थापना 1998 मध्ये शब्बीर अहमद शाहने केली होती. शब्बीर हा प्रमुख फुटिरवादी असून तो भारतविरोधी आणि पाकिस्तानसमर्थक प्रचारासाठी ओळखला जातो. शब्बीर शाह सध्या तुरुंगात कैद आहे.
1998 पासून जेकेडीएफपीच्या सदस्यांनी नेहमीच देशात फुटिरवाद आणि दहशतवादी कृत्यांना बळ पुरविले आहे. या संघटनेचे सदस्य लोकांना भडकवून काश्मीरला एक स्वतंत्र इस्लामिक देश करू इच्छितात, हा प्रकार भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचविणारा असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
जेकेडीएफपीचे नेते तसेच सदस्य दहशतवादी कारवायांचे समर्थन करणे, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक तसेच अवैध कृत्यं करण्यासाठी पाकिस्तानकडून निधी मिळविण्याच्या प्रकारात सामील राहिले आहेत असे अधिसूचनेत म्हटले गेले आहे.









