ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी जो बळाचा वापर केला, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. अश्रूधुराचा वापर आणि लाठीहल्ला यात जे जखमी झाले त्यांची मी सरकारच्या वतीने माफी मागतो. या प्रकरणात उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय बैठक मुंबईत आज पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात दोन हजार आंदोलने झाली. त्यावेळी कधीही बळाचा वापर केलेला नाही. मात्र, जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. शासनाच्या वतीने या घटनेतील जखमींची मी माफी मागतो. बळाचा वापर करण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. बळाचा वापर करण्याचं कोणतही कारण नव्हतं. या प्रकरणात उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेचे राजकारण करणे योग्य नाही.
लाठीचार्जचे आदेश एसपी किंवा डीवायएसपी देऊ शकतात. त्यासाठी कोणाला विचारावे लागत नाही. निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले तेव्हा कोणी आदेश दिला होता का, मंत्रालयातून फोन आला होता का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.