पुणे: राज ठाकरे यांनी आजपर्यंत बालवाडी चालवली नाही. ते फक्त भाषण करून समाजात तेढ निर्माण करायचं एवढंच काम करत आहेत.अशी टीका गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. ते सोमवारी पुण्यात बोलत होते. त्यांनी कालच्या भाषणात केवळ शरद पवार व भोंग्यावर भाष्य केले. त्यांच्याकडे विकासावर बोलायला काहीच नाही असेही वळसे- पाटील म्हणाले.
औरंगाबाद येथे झालेल्या सभेत पोलिसांनी सभा घेण्यापूर्वी राज ठाकरे यांना नियम घालून दिले होते. त्या नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेतही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेत. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादाचे आरोप केले म्हणून त्याचा काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. पवार साहेबांचे राजकीय आणि सामाजिक जीवन देशाला माहिती आहे. पवार साहेबांनी नेहमी विकासाचे आणि समाजाला उभे करण्याचे काम केले आहे. त्यांच्या हातून हजारो महत्त्वाचे निर्णय झाले आहेत आणि त्या निर्णयांच्या माध्यमातून आजची महाराष्ट्राची समृद्धी आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांचा वळसे-पाटील यांनी समाचार घेतला.
तुमच्याजवळ दुसरं काही सांगायला नसलं की असले काही मुद्दे काढले जातात. एखादी व्यक्ती आस्तिक असणं आणि नास्तिक असणं, यामुळे काय फरक पडतो. राज्यघटनेनुसार हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. त्यामुळे पवार नास्तिक आहेत, हा काही राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. त्याऐवजी राज ठाकरे यांनी बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे होते, असेही वळसे-पाटील यांनी सांगितले.








