पणजी / विशेष प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या 4 ऑक्टोबर रोजी गोव्याला भेट देणार आहेत. पणजीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ते अनेकांना ‘माझे घर’ योजने अंतर्गत सनदांचे वाटप करणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेऊन ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत गोव्यामध्ये जी जुनी घरे आहेत ती कोमुनिदाद किंवा सार्वजनिक ठिकाणी पूर्वीपासून उभारलेली घरे आहेत, मात्र त्यांना कायदेशीर छत्र नव्हते ते आता कायदेशीर करून देण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. अलीकडेच राज्य विधानसभेत या संदर्भातील दुऊस्ती कायदा संमत झालेला आहे. त्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी घरे बांधली परंतु ती अनधिकृत ठरलेली आहेत अशी घरे आता अधिकृत होतील आणि संबंधितांना त्यांच्या जमिनीची सनद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
भाजप सरकारचा हा मोठा उपक्रम असून यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील आमदार, पक्षाचे गोव्यातील दोन्ही खासदार हे उपस्थित राहतील. प्रत्येक मतदारसंघांमधील नागरिकांना त्यादिवशी जमिनीच्या सनदी दिल्या जातील. या कार्यक्रमाचे स्थळ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम ताळगाव येथे निश्चित करण्यात येईल. अमित शहा 4 रोजी दुपारी गोव्यात येतील कार्यक्रमात सहभागी होतील व सायंकाळी पुन्हा दिल्लीला प्रयाण करतील.








