कोल्हापूर :
जिल्हा परिषदेच्या खात्यावरून तब्बल 57 कोटीहून अधिक रक्कमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न फसला असला तरी या प्रकरणामध्ये काय दडलयं याचा शोध पोलीस प्रशासनाकडून सुरु झाला आहे. या प्रकरणातील संपूर्ण घडामोडीचा, सर्व शक्यतांचा कसून तपास सुरु असून संबंधित खात्याची माहिती, धनादेश आणि त्याचे क्रमांक याची माहिती जिल्हा परिषदेतूनच बाहेर गेली की संबंधित आरोपीने जि.प.तील संगणक हॅक करून ही माहिती मिळवली आदी पातळीवर ही चौकशी होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जिल्हा परिषदेच्या वैयक्तीक खात्यातून अशा प्रकारची कोट्यावधी रूपयांची रक्कम हडपण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोणत्याही बँकेत त्रयस्थाला कोणत्या खात्यात किती रक्कम आहे, धनादेशाचा क्रमांक किती आहे, हे सांगितले जात नाही. पण या प्रकरणात जिल्हा परिषदेकडील कोट्यावधी रुपयांचे खाते नंबर आणि धनादेशाचे क्रमांक फसवणूक करणाऱ्याकडे गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडीलच कुणीतरी खबऱ्या असावा असा संशय बळावला असून त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहारातील रक्कम हडपण्याचा घोटाळा समोर आला होता. त्याची चौकशी अद्याप सुरू आहे. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा घोटाळा करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे शासकीय योजनांमधील शासनाचे पैसेही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. विविध विभागातील घोटाळे हे कंत्राटदारांच्या बिलामधून झाले होते. मात्र हा घोटाळा डायरेक्ट तिजोरीवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे.
- पोलािसांकडून सर्व पातळीवर तपास सुरु
फसवणुकीचे प्रकरण आता पोलिसांकडे गेल्याने ते याबाबत अधिकची चौकशी करतील. वित्त विभागातील कुणी या प्रकरणात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी आहे का किंवा संगणक प्रणाली हॅक करून अज्ञात आरोपीने हे कृत्य केले आहे याबाबतही पालीसच चौकशी करतील. आमच्या विभागाचे पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य राहणार आहे.
अतुल आकूर्डेकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी








