कोल्हापूर :
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, द्वेष, मत्सर आणि मनातील वाईटाचे दहन होऊ दे…आणि सर्वांच्या जीवनात सुख, आनंद, चांगले आरोग्य, शांती नांदू दे…अशी मनोकामना व्यक्त करत शहर व परिसरात गुऊवारी होळी साजरी करण्यात आली. हुताशनी पौर्णिमेच्या औचित्यावर सर्वत्र पारंपरिक पद्धतीने टिमक्यांच्या ठेक्यावर होळीचे दहन कऊन सर्वांनी शंखनाद केला. होळीभोवतीने प्रदक्षिणाही घातल्या. घराघरी सकाळपासून सायंकाळपर्यंत होळी दहनाचा विधी सुऊ होता. सायंकाळीनंतर बहुतांश सार्वजनिक मंडळांनी आपआपल्या ठिकाणी होळीचे दहन केल्याने सर्वत्र पसरलेले धुराचे साम्राज्य रात्री उशिरापर्यंत कायम होते.
अशातच काही मंडळांनी आपल्या भागात अलीकडेच केलेल्या नव्या रस्त्यांवर होळी न करण्याचे तारतम्यही दाखवून दिले. यातून महापालिकेसह सेवाभावी संस्थांनी चांगल्या रस्त्यांवर होळी न करण्याच्या केलेल्या आवाहनाचा मानही राखला गेला. इतकेच नव्हे तर लहान होळीचे दहन करत हवा प्रदुषण रोखण्याच्या चळवळीलाही बळकटी तर आणलीच, शिवाय हजारो शेणी पंचगंगा स्मशानभूमीला दान करण्याची सामाजिक जाणिवही दाखवून दिली. काही मंडळांनी जुन्या आणि चांगल्या रस्त्यांवर बिनधास्त होळी दहन करण्याचा बेजबाबदापणा दाखवून दिला.
दरम्यान, गेली पाच महिने सहन केलेली थंडी होळीमध्ये जाळण्यासाठी आणि वसंत ऋतूचा खऱ्या अर्थाने स्वीकार करण्यासाठी करवीरनगरी सज्ज होती. लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वजणांचा होळी दहन करणे, शंखनाद करणे, सुख–समृद्धीची प्रार्थना करणे हा एककलमी कार्यक्रम होऊन गेला होता. घराच्या दर्शनीला मांडलेल्या पाच शेणींच्या होळीला पुरणपोळी, श्रीफळ अर्पण केले. होळी दहन केल्यानंतर होळी हे होळी पुरणाची पोळी असे म्हणत शंखनाद केला. होळीभोवतीने पाच प्रदक्षिणा घातल्या. जीवनात सुख–समृद्धी नांदू दे अशी मनोकामनाही व्यक्त केली.
सायंकाळीनंतर शहरातील गल्ली–बोळात शेकडोंच्या संख्येने असलेल्या मंडळांच्या होळींचा माहोल तयार झाला. काही मंडळांनी पदरमोड करून तर काही मंडळांनी जमलेल्या वर्गणीतून शेणी, लाकडे जमवून येरंडाच्या फांदी भोवतीने होळीची मांडणी केली. फुगे, फुले, हारांनी सजावटही केली. मंडळ परिसरातील कुटुंबीयांनी होळीला पुरणपोळ्या अर्पण केल्या. ज्येष्ठांच्या हस्ते होळींचे दहन केल्यानंतर शंखनादाचा एकच कल्लोळ माजला. या सगळ्या धामधुमीत अनेक मंडळांनी होळी लहान केल्याचे दिसले. या कृतीतून हवा प्रदुषण रेखण्यासाठी पाऊल उचलल्याचे प्रकषर्णाने दिसून आले. काही मंडळांनी मात्र रस्त्याच्या मधेच होळी केले. त्यामुळे आधीच खराब असलेले रस्ते आणखी खराब झाल्याचेही पहायला मिळाले.
- कोरटकरच्या प्रतिमेचे दहन…
कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याचा धमकी देणाऱ्या नागपूरमधील प्रशांत कोरटकरबद्दलची भावना होळीतून व्यक्त झाली. मंगळवार पेठेत शिवशंभू प्रेमींनी केलेल्या होळीला तर चक्क कोरटकरची प्रतिमा बांधली होती. होळीबरोबरच प्रतिमेचे दहन करत शंखनाद केला. इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह राष्ट्रपुऊषांची बदनामी करणाऱ्यांच्या नावाने शिमगा साजरा केला जाईल, असा इशाराही शिवशंभोप्रेमींनी दिला आहे.








