वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, यमनापूर, शाहूनगर परिसरामध्ये होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने व विविध धार्मिक विधीसह रंगाची उधळण करत शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काल गुरुवारी देवस्थान पंच कमिटीच्यावतीने संध्याकाळी सावरीच्या झाडाची एक मोठी फांदी पूजन करून ढोल-ताशाच्या निनादात वाजतगाजत गावातील मुख्य होळी कामाण्णा मंदिरसमोर आणून ठेवण्यात आली. शुक्रवारी सकाळी देवस्थान पंचकमिटी व ग्रामस्थांच्यावतीने आबोंलीच्या लहान फांद्यानी सजवून होळी कामाण्णा मंदिरसमोर उभे करून विधीवत पूजन करून होळी पेटवून होळी उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर दिवसभर ग्रामस्थांनी पाच गोवऱ्या पेटविलेल्या होळीमध्ये अर्पण करून नारळ फोडून होळी कामाण्णा देवस्थानचा आशीर्वाद घेतला. सकाळी 7 वाजल्यापासूनच संपूर्ण गावभर तरुणांबरोबर महिलांनीही रंगाची उधळण करत सणाचा आनंद लुटला.
कंग्राळी खुर्द येथे पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा
कंग्राळी खुर्द गावामध्ये होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने व विविध धार्मिक विधीसह रंगाची उधळण करत मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त गुरुवारी रात्री गावातील हक्कदार गावडे, गोठणीवाले भाविकानी एक छोटासा बांबूचे बेट आणून होळी कामाण्णा मंदिरसमोर उभे केले. त्याभोवती ग्रामस्थांनी प्रत्येकी पाच गोवऱ्या आणून रचल्या. त्यानंतर रात्री 9 वा. हक्कदार मानकऱ्यांच्या घरातून अग्नी आणून गाऱ्हाणा घालून होळी पेटविली. त्यानंतर भाविकांनी नैवेद्य दाखवून व श्रीफळ वाढवून पूजन केले. गावातील मुख्य विस्तारीत परिसरात होळी रचून पूजन करून होळी साजरी केली. त्यानंतर शुक्रवारी 14 रोजी सकाळी 7 पासून चौकाचौकामध्ये शॉवर उभे करून होळीवर आधारीत गाण्यावर नृत्य करत एकमेकावर रंगाची उधळण करत एकमेकांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. दुपारी 1 वाजेपर्यंत हा आनंदोत्सव सुरू होता. त्यानंतर गावातील प्रथेप्रमाणे दुपारी 12 नंतर लोक वनमहोत्सव साजरा करण्यासाठी ही शेतात जाऊन सामूहिक वनभोजनाचा आनंद लुटला.









