पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव
बेळगाव : शहरासह उपनगरात सोमवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी रचलेल्या गोवऱ्या व डहाळीला नारळ, बाशिंग बांधून होळीची पूजा करण्यात आली. दरम्यान होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून प्रज्वलित करण्यात आली. होळी कामाण्णांची पूजा करून होळीत नैवेद्य व नारळ अर्पण करण्यात आला. होळी आणि धुलिवंदनासाठी शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, चव्हाट गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली, समादेवी गल्ली, कंग्राळ गल्ली, गणपत गल्ली, टेंग्गीनकेरा गल्ली, भुई गल्ली, भातकांडे गल्ली, खडक गल्ली आदी ठिकाणी होळी पेटविण्यात आली. तर काही ठिकाणी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यावर भर देण्यात आला. रचलेल्या होळीसभोवती आकर्षक रांगोळी-सजावट केली होती. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा होळी उत्साहात साजरी झाली.
पर्यावरणपूरक होळी
शहरात काही ठिकाणी पर्यावरणपूरक होळी साजरी करून सामाजिक संदेश देण्यात आला. कचरा व वाळलेली झुडुपे पेटवून होळी साजरी केली. तर काही ठिकाणी वाईट प्रवृत्तींची प्रतिकात्मक होळी पेटविण्यात आली. काही सामाजिक संघटनांनी होळीसाठी गोवऱ्यांचा वापर करावा, असे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत काही ठिकाणी गोवऱ्यांद्वारे होळी साजरी करण्यात आली. होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. त्यामुळे बालचमूंसह तऊणांचा उत्साह वाढला आहे. सोमवारी शहरात गल्लोगल्ली कामाण्णा मूर्तीची प्रतिष्ठापना करून सार्वजनिक होळी पेटविण्यात आली. यासाठी लाकूड, गोवऱ्या यांची तयारीदेखील पहायला मिळाली. नागरिक, महिला आणि बालचमूंचीदेखील होळी पेटविताना रेलचेल दिसून आली.









