काँग्रेस हायकमांडची राज्य नेत्यांना सूचना : प्रदेशाध्यक्ष बदलण्यास नकार
प्रतिनिधी/ बेंगळूर
जिल्हा, तालुका पंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एप्रिल-मे महिन्यात निवडणुका घ्या, अशी सूचना काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेच कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील, यात कोणताही बदल नाही, असा स्पष्ट संदेशही काँग्रेसश्रेष्ठींनी दिली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही क्षणी जिल्हा आणि तालुका पंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत पक्षासाठी नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केल्यास रणनीती आणखे कठीण होईल.
विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षासाठी चांगल्याप्रकारे काम करत विजय मिळवून दिला आहे. हाच उत्साह तुम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना सत्ता मिळवून देण्यासाठी व पक्षसंघटनेसाठी दाखवावा, अशी सूचना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालाचे कौतुक केले. कार्यकर्त्यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळवून द्या, अशी सूचना राज्य नेत्यांना दिली.
कर्नाटकात काँग्रेसच्या ताकदीत वाढ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत कोणतेही राजकीय निर्णय घेऊ नयेत. अत्यंत गरजेचे असेल तर आमच्या निदर्शनास आणून देऊनच कार्यवाही करा. कर्नाटकात काँग्रेसची ताकद वाढत आहे. भाजपला अंतर्गत कलहाची चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही याचा राजकीयदृष्ट्या वापर करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला पोषक वातावरण असेल. त्यामुळे तुमची आणि पक्षाची ताकदही वाढेल, असा सल्लाही हायकमांडने राज्य नेत्यांना दिला आहे.
अबकारी मंत्र्यांचे खातेबदल करू नका
केवळ निगम-महामंडळांवर अध्यक्ष, सदस्यांची नेमणूक करून कार्यकर्त्यांना समाधानी करता येत नाही. जनतेतून निवडून येऊन त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी द्या. यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन आणखी विकास करण्यास मदत होईल. विधिमंडळ अधिवेशन संपेपर्यंत अबकारी मंत्र्यांचे खातेबदल करू नका, अशी सूचनाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
खातेबदल करून अधिवेशनाला सामोरे जाणे तितके सोपे नाही. यामुळे ते एक आरोपी म्हणून विरोधी पक्षांच्या नजरेसमोर राहतील, तुम्हीही कोंडीत सापडण्याची भीती आहे, असा सबुरीचा सल्लाही हायकमांडने दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्यांनी बी. नागेंद्र यांना शब्द दिला आहे. त्यांना पुन्हा संधी देऊन मंत्रिमंडळातील रिक्त एक जागा भरण्यात येईल, असे सांगितले. त्यावर खर्गेंनी परिस्थिती पाहून निर्णय घ्या, असा सल्ला दिला.









