कृषीपंप पाणी मीटरच्या निर्णयाविरोधात मेळाव्यात इरिगेशन फेडरेशन चा इशारा
पेठनाका येथे मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित
६ जूनच्या बैठकीतील निर्णयाचा शासनाला विसर पडल्याचा आरोप
कोल्हापूर
राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांसह वैयक्तिक कृषिपंपाना पाणी मीटर (जलमापक यंत्र) बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. घनमापन पद्धतीने पाणी मोजणी व आकारणी करण्यासाठी ‘राज्य आकारमानात्मक मापन रूपांतरण कार्यक्रम’ सर्व पाटबंधारे महामंडळांनी राबविण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी वापरण्यावर मर्यादा येणार असून मीटरनुसार जादा पाणीपट्टीचा भुर्दंड बसणार आहे. या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने बुधवारी (25 डिसेंबर) जनाई गार्डन हॉल पेठ-शिराळ रोड गोळेवाडी बस स्टॉपनजीक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.
विक्रांत पाटील म्हणाले, राज्यामध्ये सर्वच जिह्यांमध्ये शेतकऱ्यांची जमीन संपादन करून धरणांची निर्मीती केली. धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. त्या मोबदल्यात आपल्या जमिनींना बारमाही शासकीय पाणीपटीच्या नाममात्र दरात मुबलक पाणी मिळणार अशी शेतकऱ्यांची धारणा होती. पण तसे घडत नाही. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामार्फत पाणीपटीचे दर ठरविले जाऊ लागले आहेत. तसेच सर्वच कृषिपंपाना पाणी वापराचे मिटर बसवून घनमापन पध्दतीने पाणी पटी आकारणी होणार आहे. जे शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्था जलमापक यंत्र बसविणार नाहीत, त्यांना निश्चित दराच्या दराच्या दुप्पट पाणी पटीची आकारणी होणार आहे.
2019 व 21 मध्ये आलेला महापूर कोवीड महामारी व प्रत्येक वर्षी अवकाळी व परतीचा पाऊस अशा शेतकऱ्यांवर येणाऱ्या वारंवार संकटाचा विचार करुन जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर अधारीत दर मिळत नाही, तोपर्यंत हा दर स्थिर ठेवून यामध्ये किमान 10 वर्षे दरवाढ करू नये. जलमापक यंत्र बसविण्याच्या आदेशाविरोधात आमदार अरुण लाड, डॉ भारत पाटणकर, माजी आमदार संजय घाटगे, प्रतीक पाटील, आर.जी.तांबे, जे.पी.लाड यांच्या नेतृत्वाखाली पेठ नाका येथे मेळावा आयोजित केला आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्यावतीने या मेळाव्याचे संयोजन केले आहे. तरी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था सभासद व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले आहे.








