अभिजन भारत असोसिएट्स ट्रस्टची मागणी
बेळगाव : बेळगावमधील रुग्णांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या निवारण करण्यासाठी कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट 2007 नुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने जिल्ह्यातील रुग्णांच्या तक्रारी तात्काळ सोडवाव्यात, अशी मागणी अभिजन भारत असोसिएट्स ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा प्रचंड महाग झाल्या आहेत. बऱ्याचवेळा विनाकारण रुग्णांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये सर्वसामान्य भरडला जात असून हे गैरप्रकार रोखण्यासाठी तक्रार निवारण समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश असतो. अनेक तक्रारी असून देखील अद्याप या समितीने कोणतेच रुग्णालय अथवा डॉक्टरवर कारवाई केलेली नाही.
जागृती करण्याचे आवाहन
रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या समितीची बैठक लवकरात लवकर व्हावी अशी मागणी करण्यात आली. बऱ्याच नागरिकांना तक्रार कोठे करायची हे देखील माहिती नसल्याने याबाबत जागृती करण्याचेही आवाहन करण्यात आले. यावेळी अॅड. माधव चव्हाण, अॅड. रविंद्रनाथ चव्हाण, अॅड. रवींद्र गुंजाळे यासह इतर उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट
समितीची बैठक तातडीने व्हावी, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. डॉ. ईश्वरप्पा गडद यांनी बैठक लवकरच होईल असे आश्वासन देत या बैठकीला अभिजन भारत असोसिएट्सच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जाईल, रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यांनी या समितीकडे तक्रारी मांडण्याचे आवाहनही त्यांनी केले.









