अदानी, जेएसडब्ल्यू व्यवसाय घेण्यासाठी इच्छुक : लवकरच चित्र स्पष्ट होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज सिमेंट उत्पादक कंपनी होलसीम लिमिटेड आपला भारतातील व्यवसाय गुंडाळणार असल्याची माहिती आहे. या संदर्भातल्या तयारीला कंपनीने वेग दिला असल्याचे सांगितले जात आहे. सदरच्या कंपनीची खरेदी करण्यासाठी अदानी उद्योग समूह आणि जेएसडब्ल्यू यांच्यामध्ये स्पर्धा लागली असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. हा व्यवहार आता कोणाच्या पारडय़ात पडणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे.
होलसीमचा अंबुजात हिस्सा
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सध्याला या संदर्भातील व्यवहाराची प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. होलसीम लिमिटेडने या संदर्भात मात्र कोणताही खुलासा केलेला नाही. होलसीमचा भारतामध्ये अंबुजा सिमेंटमध्ये 63 टक्के इतका वाटा आहे. ज्यांचे बाजार भांडवल अंदाजे 9.6 अब्ज डॉलर्स इतके आहे. अंबुजाशिवाय एसीसी सिमेंटही होलसीम लिमिटेड अंतर्गत येते. एसीसी ही अंबुजाची सहकारी कंपनी आहे.
समभाग वधारले
अंबुजा सिमेंटचा समभागाचा भाव बुधवारी 2 टक्क्यांच्या वाढीसह 369 वर व्यवहार करत होता. कंपनीचे बाजार भांडवल 73,349 कोटी रुपये इतके आहे. तर एसीसीचा समभाग एक टक्के वाढीसह 2,207 रुपयांवर बुधवारी व्यवहार करत होता. जिचे बाजार भांडवल 41,450 कोटी रुपये इतके आहे.









