किल्ला तलाव येथील ध्वजारोहणाने साऱयांनाच स्फूर्ति
प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ असलेल्या किल्ला तलावाजळील ध्वजस्तंभावर शनिवारी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तब्बल 9 हजार 600 चौरस फुटाचा आणि 110 मीटर उंच स्तंभावर ध्वज फडकविण्यात आला. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांच्या योगदानाचे प्रत्येकाने स्मरण करणे गरजेचे आहे. देशाचा सर्वांनाच अभिमान वाटतो. देश म्हणजे आपली माता आहे. याचे स्मरण करून प्रत्येकाने अमृतमहोत्सवानिमित्त ध्वजारोहण करावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, अमृतमहोत्सवादरम्यान प्रत्येकाच्या घरावर ध्वज फडकविण्यासाठी भारत सरकारने ध्वजसंहितेमध्ये बदल केला आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत ध्वजारोहण करता येणार आहे. तेव्हा या मोहिमेमध्ये प्रत्येकाने भाग घ्यावा.
विधान परिषद सदस्य डॉ. साबण्णा तळवार, चन्नराज हट्टीहोळी, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, महापालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आदी उपस्थित होते.
भरपावसातच ध्वजारोहण
यावेळी ध्वजारोहण करताना पाऊस आला. पावसातच ध्वजारोहण करण्यात आले. पाऊस आणि आकाशात चढविण्यात येत असलेला ध्वज यामुळे एक वेगळेच चित्र साऱयांना पाहायला मिळाले.
तिरंगा मिरवणूक यात्रा
ध्वजारोहणानंतर 75 मीटर लांबीचा तिरंगा घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये अधिकाऱयांबरोबरच नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात येत होत्या. याचबरोबर पुष्पवर्षावही करण्यात येत होता. चन्नम्मा चौक येथे राणी चन्नम्मांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली.









