वृत्तसंस्था / चेन्नई
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची कनिष्ट पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा येत्या नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान आयोजित केली असून चेन्नई आणि मदुराई या स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहेत.
सदर स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांचा समावेश राहिल. भारतामध्ये आतापर्यंत यापूर्वी दोनवेळा विश्वचषक हॉकी स्पर्धा भरविली गेली होती. 2016 साली लखनौ आणि भुवनेश्वरमध्ये 2021 साली दुसऱ्यांदा ही स्पर्धा भारतात झाली होती. 2016 ची कनिष्ट पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारताने जिंकली होती. 2025 च्या कनिष्ट पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील सामने चेन्नई आणि मदुराईमध्ये खेळविले जातील. 2023 सालातील आशियाई चॅम्पिन्स करंडक हॉकी स्पर्धा मदुराईमध्ये यशस्वीपणे भरविली गेली होती. 2021 ची कनिष्ठ पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा अर्जेंटिनाने तर 2023 ची कौलालंपूर येथे झालेली ही स्पर्धा जर्मनीने जिंकली होती. भारताला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.









