वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारतीय पुरूष हॉकी संघाने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या त्यांच्या एफआयएच प्रो लीगच्या सलामीच्या सामन्यात स्पेनचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात हरमनप्रीत सिंगने त्याला जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर का मानले जाते त्याचे कारण पुन्हा एकदा दाखवून दिले.
सामन्याला सात मिनिटे झाली असताना भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि हरमनप्रीतने त्याचे गोलात रुपांतर करताना स्पॅनिश गोलरक्षक लुईस कॅलझाडोच्या पायामधून चेंडू फटकावला. दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीला भारताने आणखी एक आणि त्यानंतर दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले. भारतीय कर्णधार गोलच्या दिशेने फटके हाणत राहिला आणि कॅलझाडोने ते रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेरीस हरमनप्रीतला पेनल्टी स्ट्रोक मिळविण्यात यश आले आणि 20 व्या मिनिटाला त्याने त्यावर गोल केला. यावेळी गोलरक्षक दुसऱ्या बाजूने झेपावला, तर हरमनप्रीतने तळाशी उजव्या कोपऱ्यात चेंडू फटकावला.
सामनावीर ठरलेल्या हरमनप्रीतने अशा प्रकारे चांगली सुऊवात करून दिल्यानंतर चार मिनिटांनी जुगराज सिंगने 3-0 अशी आघाडी वाढविताना भारताच्या सहाव्या पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर केले. तिसऱ्या सत्रात स्पेनने प्रतिकार करताना आघाडी कमी केली. यावेळी मार्क मिरालेसने पेनल्टी स्ट्रोकला गोलात रूपांतरित केले. परंतु वर्चस्व राहूनही पाहुण्यांना आणखी एकही गोल करता आला नाही कारण भारताच्या बचावपटूंनी, विशेषत: जुगराजने चांगल्या प्रकारे बचाव केला.
अंतिम सत्रात स्पेनने आणखी तीन पेनल्टी कॉर्नर मिळविले, परंतु आपला 350 वा सामना खेळणाऱ्या मनप्रीत सिंगने चमकदार कामगिरी करताना स्पेनला लक्ष्य गाठता येणार नाही याची काळजी घेतली. दरम्यान, ललितकुमार उपाध्यायने 10 मिनिटे बाकी असताना गोल करत 4-1 अशी आघाडी वाढविली. भारताचा सामना आता नेदरलँड्सशी होणार आहे.









