वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला हॉकी संघातील अनुभवी आणि पेनल्टी कॉर्नरतज्ञ दीप ग्रेस एक्काने आपल्या आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्राला निरोप दिला आहे. शनिवारी एक्काने आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली.
भारतीय महिला हॉकीपटू दीप ग्रेस एक्काने आपल्या वैयक्तिक हॉकी कारकिर्दीत दोन वेळेला ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले. 2011 ते 2023 या 12 वर्षांच्या कालावधीत 29 वर्षीय दीप ग्रेस एक्काने आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी केली. एक्काच्या दर्जेदार कामगिरीमुळे 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघ पात्र ठरला होता. भारतीय महिला हॉकी संघामध्ये दीप ग्रेस एक्का बचाव फळी सांभाळत होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला चौथे स्थान मिळाले होते. या स्पर्धेमध्ये दीप ग्रेस एक्काची कामगिरी कौतुकास्पद झाली होती. 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघामध्ये एक्काचा समावेश होता. 2014 आणि 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके मिळविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील एक्काने चमकदार कामगिरी केली होती. ओडीशातील लुलकिढी ग्रामीण भागामध्ये एक्काचे वास्तव्य होते. 2013 साली जर्मनीत झालेल्या महिलांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघामध्ये एक्काचा समावेश होता. दीप ग्रेस एक्काचे भारतीय हॉकी क्षेत्रातील योगदानाबद्दल हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप र्तिकी यांनी खास कौतुक करत तिला भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.









