वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हॉकी इंडियातर्फे 2024 सालातील सातवा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ येथे शनिवार 15 मार्च रोजी आयोजित केला आहे. भारतीय हॉकी संघाने 1975 साली विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली होती. या कामगिरीला तब्बल 50 वर्षे पूर्ण झाली असून हा सुवर्ण महोत्सवी सोहळा आयोजित केला जाणार आहे.
15 मार्च 1975 रोजी भारतीय हॉकी संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली होती. तत्कालीन भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व अजित पाल सिंग करत होते. सदर स्पर्धा कौलालंपूर येथे झाली होती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव करुन विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली होती.
शनिवारी होणाऱ्या हॉकी इंडियाच्या पुरस्कार वितरण समारंभावेळी 1975 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय हॉकी संघातील खेळाडूंचा हॉकी इंडियातर्फे खास सत्कार करण्यात येणार आहे. 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी सुवर्णपदक तसेच 1975 च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील जेतेपद हे भारतीय हॉकी संघाची विशेष कौतुकास्पद कामगिरी म्हणून ओळखली जाते. यानंतरही तब्बल 50 वर्षे झाली असली तरी भारतीय हॉकी संघाच्या या कामगिरीची आठवण आजही सदैव स्मरणात राहिली आहे.









