पहिल्या सामन्यात यजमान संघ 2-1 गोलफरकाने विजयी
वृत्तसंस्था/ टेरासा, स्पेन
स्पॅनिश हॉकी फेडरेशनच्या शताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने झुंजार खेळ केला, पण त्यांना यजमानांकडून 1-2 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला.
कर्णधार हरमनप्रीत सिंगने 59 व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल नोंदवला तर पावू कनिल (11 वे मिनिट), जोआकिन मेनिनी (33 वे मिनिट) यांनी स्पेनचे गोल केले. भारताने या सामन्याची आक्रमक सुरुवात करीत पहिल्या सत्रात स्पेनवर वारंवार दडपण आणले होते. पण त्यांना गोल नोंदवता आला नाही. पहिले सत्र पुढे सरकेल तसे स्पेनने लय मिळविल्यानंतर 11 व्या मिनिटाला पावू कनिलने गोल नोंदवून स्पेनला आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडल्यानंतर भारतानेही जोरदार प्रतिआक्रमण सुरू केले आणि दुसऱ्या सत्रात बरोबरीसाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. पण स्पेनच्या भक्कम बचावफळीने भारताला बरोबरी साधू दिली नाही. या सत्रात गोल होऊ शकला नाही. त्यामुळे मध्यंतराला स्पेन 1-0 असे आघाडीवर होते.
भारताने तिसऱ्या सत्राची सुरुवातही आक्रमक केली आणि स्पेनच्या बचावफळीवर वारंवार दबाव आणला. मात्र स्पेनने भारताला गोल करण्यापासून दूर ठेवताना 33 व्या मिनिटाला आपली आघाडीही वाढवली. जोआकिन मेनिनीने जोस बास्टेराच्या पासवर चेंडू डिफ्लेक्ट करीत हा दुसरा गोल नोंदवला. दोन गोलांनी पिछाडीवर पडलेल्या भारताने तेज आक्रमण सुरू केले आणि स्पेनवर बरेच दडपण आणत एक पेनल्टी कॉर्नरही मिळविला. पण भारताला त्याचा लाभ घेता आला नाही. याशिवाय तिसऱ्या सत्राच्या अखेरीस हरमनप्रीतचा लांबवरून मारलेला एक जोरदार फटकाही स्पेनच्या गोलरक्षकाने थोपवला. त्यामुळे या सत्रात स्पेनची आघाडी 2-1 अशी राहिली.
शेवटच्या सत्रात मात्र भारताने आपला खेळ उंचावला आणि गोल करण्याच्या काही संधीही मिळविल्या. पण गोल नेंदवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता. स्पेनने प्रतिआक्रमण करण्याचे धोरण अवलंबत लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्यावर त्यांना गोल करता आले नाहीत. भारताने स्पेनच्या बचावफळीवर दबाव आणणे चालूच ठेवले आणि त्यांना पहिले व एकमेव यश मिळाले. हरमनप्रीतने 59 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर हा गोल नोंदवत यजमानांची आघाडी कमी केली. स्पेनने भारताला बरोबरी साधण्यापासून रोखत विजय साकार केला. भारताचा दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.