वृत्तसंस्था/ भुवनेश्वर (ओडिशा)
हॉकी इंडियातर्फे येथे झालेल्या 13 व्या राष्ट्रीय कनिष्ठ पुरुषांच्या 2023 च्या हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचे अजिंक्यपद मध्यप्रदेशने पटकाविले. येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मध्यप्रदेशने चंदीगडचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेत हरियाणाने तिसरे स्थान मिळविताना ओडिशाचा 3-1 असा पराभव केला.
मध्यप्रदेश आणि चंदीगड यांच्यातील अंतिम सामन्यात मध्यप्रदेश संघातर्फे श्रेयस धुपेने 17 व्या आणि 46 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. मोहम्मद दादने 25 व्या मिनिटाला तर अली अहमदने 52 व्या मिनिटाला प्रत्येकी 1 गोल केला. चंदीगडतर्फे सुमितने 9 व्या मिनिटाला तर सुरिंदरसिंगने 31 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात हरियाणाने ओडीशाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. हरियाणा संघातर्फे शुभमने 4 थ्या मिनिटाला, कर्णधार रोहित ने 28 व्या मिनिटाला तर पी. पांचाळने 51 व्या मिनिटाला गोल केले. ओडिशातर्फे एकमेव गोल 53 व्या मिनिटाला आकाश सोरेंगने केला. या स्पर्धेतील तत्पूर्वी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्यप्रदेशने ओडिशाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-4 (12-11) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.









