वृत्तसंस्था/ लंडन
2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांतून हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी यासारख्या प्रमुख खेळांना यजमान शहर ग्लासगोने. वगळले आहे, ज्याने 10 खेळांची छाटणी केली आहे. स्पर्धेचे बजेट सांभाळण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असून यामुळे भारताच्या पदक जिंकण्याच्या संधींना मोठा धक्का बसला आहे.
टेबल टेनिस, स्क्वॅश आणि ट्रायथलॉन यांना देखील खर्च मर्यादित करण्यासाठी आणि लॉजिस्टिक्स सुव्यवस्थित करण्यासाठी गाळण्यात आले आहे. कारण केवळ चार ठिकाणे संपूर्ण स्पर्धेचे आयोजन करतील. 2022 च्या बर्मिंगहॅम आवृत्तीच्या तुलनेत येत्या गेम्समधील एकूण प्रकारांची संख्या नऊ इतकी कमी असेल. 23 वे राष्ट्रकुल खेळ 23 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान होणार आहेत. 2014 च्या स्पर्धेनंतर 12 वर्षांनी ग्लासगोचे यजमान म्हणून पुनरागमन झाले आहे.
या खेळांच्या कार्यक्रमात अॅथलेटिक्स आणि पॅरा अॅथलेटिक्स (ट्रॅक अँड फिल्ड), जलतरण आणि पॅराजलतरण, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युदो, बाऊल्स आणि पॅरा बाऊल्स तसेच 3×3 बास्केटबॉल आणि 3×3 व्हीलचेअर बास्केटबॉल यांचा समावेश असेल, असे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने एका निवेदनात म्हटले आहे.
हे खेळ स्कॉटस्टॉन स्टेडियम, टोलक्रॉस इंटरनॅशनल स्विमिंग सेंटर, सर ख्रिस हॉय वेलोड्रोमसह एमिरेट्स अरेना आणि स्कॉटिश इव्हेंट कॅम्प अशा चार ठिकाणी या स्पर्धा होतील. वरील प्रकार काढून टाकणे हा भारताच्या पदकप्राप्तीच्या संधींना मोठा धक्का आहे. कारण देशाची बहुतेक पदके मागील स्पर्धेमध्ये याच काढून टाकलेल्या प्रकारांत प्राप्त झाली होती. लॉजिस्टिक्समुळे चार वर्षांपूर्वी बर्मिंगहॅम स्पर्धेतून वगळल्यानंतर नेमबाजी परत येण्याची अपेक्षा नव्हती.
खास करून हॉकीला खेळातून वगळणे हा भारतासाठी मोठा धक्का असेल. पुऊष संघाने या खेळांत तीन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत, तर महिलांनी 2002 च्या खेळांमधील ऐतिहासिक सुवर्णासह तीन पदके जिंकून चमक दाखवली आहे. बॅडमिंटनमध्ये भारताने 10 सुवर्ण, 8 रौप्य आणि 13 कांस्य अशी एकूण 31 पदके जिंकली आहेत. नेमबाजी हा भारताचा गड राहिलेला असून तब्बल 135 पदके नावावर आहेत. यात 63 सुवर्ण, 44 रौप्य आणि 28 कांस्यपदकांचा समावेश आहे. तर कुस्तीमध्ये देशाला 49 सुवर्ण, 39 रौप्य आणि 26 कांस्यांसह 114 पदके मिळालेली आहेत. 2022 मध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाल्यानंतर भारतीय महिला संघाने रौप्यपदक मिळविले होते.









