‘स्टिंग ऑपरेशन’च्यावेळी चेकपोस्टवरुन पळाले कर्मचारी : आपच्या कार्यकर्त्यांनाच अधिकारी समजून दिली लाच
पणजी : आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक अॅड. अमित पालेकर यांनी बुधवारी पहाटे काही पत्रकारांसह केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून काणकोण तालुक्यातील पोळे चेकपोस्टवरील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. त्यानंतर ‘सारे काही एका मॅडमसाठी’ होत असल्याचा दावा त्यांनी गुऊवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी उपाध्यक्ष संदेश तेलेकर यांचीही उपस्थिती होती. पालेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडक पत्रकारांसह बुधवारी रात्री अचानक काणकोण चेकपोस्टवर धडक दिली असता तेथे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे दिसून आले.
चेकपोस्ट सोडून कर्मचारी पळाले
स्टिंग ऑपरेशन होत असल्याचा सुगावा लागताच तेथील वाहतूक खात्याच्या चेकपोस्टवरील काही कर्मचारी गोळा केलेल्या पैशांची थैली घेऊन जंगलात पळून गेले. त्याशिवाय तेथील 100 टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही पैसे, महत्त्वाची कागदपत्रे यांच्यासह चेकपोस्ट सताड उघडा ठेवत तेथून पळ काढला.
वाहनचालक पालेकरांनाच समजले आरटीओ
पालेकर आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या खुर्च्यांचा ताबा घेतला असता नंतर आलेल्या काही वाहनचालकांनी त्यांनाच आरटीओ अधिकारी असल्याचे समजून लाचेचे पैसे त्यांच्या हाती थोपवले. त्यावेळी सहज म्हणून जास्त पैशांची मागणी केली असता तेही त्यांनी काढून दिले, असे पालेकर यांनी सांगितले.
प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराचा कळस
काणकोण येथे गेलेल्या आप’च्या या भ्रष्टाचारविरोधी पथकाने आरटीओसह पोलीस, अबकारी खाते, आणि मार्केटिंग फेडरेशन यांचेही चेकनाक्यांवर धडक दिली असता प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचे दिसून आले. राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांसह बाहेर जाणाऱ्या वाहनांकडूनही लाच घेण्यात येत असून 20 ऊपयांपासून 1500 ऊपयेपर्यंत पैसे आकारले जात असल्याचे उघडकीस आले असल्याचे पालेकर यांनी सांगितले.
टपाल वाहनचालकही देतो लाच
या सर्वांवर कहर म्हणजे या मार्गावर नियमित ये-जा करणाऱ्या ‘टपाल खात्याच्या’ एका वाहन चालकाकडूनही या चेकनाक्यावर 200 ऊपये लाच देण्यात येत असल्याचे या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या निदर्शनास आले. हा सर्व प्रकार पाहता टपाल खात्याच्या वाहनातून स्मगलिंग वगैरे होत असावे का? असा संशय पालेकर यांनी व्यक्त केला. पोळे चेक नाक्यावरून दिवसाला 2 ते 3 हजार मालवाहू वाहने, प्रवासी गाड्या गोव्यात प्रवेश करीत असतात. त्या प्रत्येक वाहनचालकांकडून प्रवेश फी या नावाखाली 2 ते 3 हजार ऊपये गोळा केले जातात. त्यासाठी अबकारी खाते आणि पोलिस खात्याने खास एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. ही वसुली करणारी व्यक्ती सरकारी नोकर नसून खाजगी व्यक्ती आहे. या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चालत नाहीत. आवश्यक त्या ठिकाणी ते मुद्दामहून बसविण्यात आलेले नाहीत. पोळे चेक नाक्यावरील गेट रात्रंदिवस उघडाच असतो. या उलट शेजारच्या माजाळी चेक नाक्यावर मात्र प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जाते. पोळे चेकपोस्टवरून सोडलेली बेकायदेशिर दारूची वाहने माजाळी चेक नाक्यावर पकडली जातात. त्याने गोव्याचे नाव खराब होत असल्याचा आरोप पालेकर यानी केला आहे.
त्या ’मॅडम’चा मुख्यमंत्र्यांनी शोध घ्यावा
या दरम्यान स्टिंग ऑपरेशन होत असल्याचे समजताच एका नाक्यावरील कर्मचारी बाहेर येऊन कुणालातरी फोन लावून माहिती देऊ लागला. त्यावेळी त्याच्या तोंडून ‘मॅडम, मॅडम’ असे शब्द वारंवार उच्चारले जात होते. त्यामुळे ही ’मॅडम’ कोण? असा सवाल पालेकर यांनी उपस्थित केला असून मुख्यमंत्र्यांनी ’तिचा’ शोध घ्यावा, तसेच ‘त्या’ कर्मचाऱ्याने केलेल्या फोनचे क्रमांक जाहीर करावेत, असे आव्हान दिले.
मुख्यमंत्री, वाहतूकमंत्र्यांनी खुलासा करावा
चेकपोस्टवर असे खुल्लमखुल्ला लाच स्वीकरण्याचे प्रकार घडत राहिल्यास एखादवेळी अतिरेकीसुद्धा राज्यात प्रवेश करू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पोलीस आणि अबकारी खाते सांभाळणारे मुख्यमंत्री तसेच वाहतूक खाते सांभाळणारे माविन गुदिन्हो यांनी या प्रकरणांचा खुलासा करावा करावा, अन्यथा त्यांच्याच सांगण्यावरून आणि ‘त्या’ मॅडमच्या माध्यमातून हे प्रकार सुरू असल्याचे समजले जाईल, असेही पालेकर यांनी सांगितले.









