विनायक भोसले,/कोल्हापूर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर म्हणजेच 7 महिन्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा मैदानात उतरला. यावेळी त्याची शरीरयष्टी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण रोहित शर्मा बारीक झाल्याचे पहायला मिळाले. पोटही आत गेले होते, इतका बदल झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याने 10 किलो वजन कमी केले असून यासाठी त्याने 252 तास मेहनत घेतली आहे. अर्थात, रोहितमध्ये इतका बदल कसा झाला, त्याने कशी मेहनत घेतली याचाच घेतलेला थोडक्यात आढावा.
आयसीसी टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. यानंतर त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेचच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आपण फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो आता सात महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी मैदानात उतरला. यावेळी त्याला पाहताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारणही तसेच होते. मैदानात चेंडू हिट करणारा हिटमॅन अगदी फिट’मॅन दिसत होता. मागील काही महिन्यापासून रोहितने तब्बल 10 किलो वजन कमी केले आहे. यामध्ये सर्वात मोठे योगदान राहिले आहे ते त्याचा मित्र अभिषेक नायरचे. रोहितने नायरसोबत मागील काही महिन्यात फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे.
खडतर मेहनत, आहारात बदल अन् फिटमॅन
रोहित सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यात त्याने निराशा केली असली तरी पुढील सामन्यात तो शानदार कामगिरी करेल, यात शंकाच नाही. दरम्यान, रोहितचा फिटनेस गुरु असलेला अभिषेक यावेळी म्हणाला, रोहितने 12 आठवड्यांच्या प्रशिक्षणापैकी 8 आठवडे कठोर प्रशिक्षणासाठी घालवले. तर 4 आठवडे त्याने फलंदाजीचे कौशल्य आणि इतर पैलूंच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले. सुरुवातीला आम्ही त्याच्या कार्डीओवर जास्त भर दिला नाही. सुरुवातीच्या 5 आठवड्यात त्याची मानसिकता एका बॉडी बिल्डरसारखी होती. जिथे त्याला फक्त वजन कमी करायचे होते. त्याने एका बॉडी बिल्डरप्रमाणे प्रशिक्षण घेतले. यासाठी त्याने दिवसातून तीन तास सराव केला.
याशिवाय, नायरने त्याच्या बदललेल्या डाएटविषयी सांगितले. तो म्हणाला, फिटनेसवर फोकस करत असताना रोहितच्या आहारातही बदल करावा लागला. त्याच्या खाण्या पिण्याच्या सवयी नियंत्रणात आणाव्या लागल्या. हे करत असताना त्याने आवडीची गोष्ट असलेल्या वडा पावला हात देखील लावला नसल्याचे नायरने सांगितले. 10 किलोग्रॅम वजन कमी केल्यानंतर, रोहितला त्याच्या चपळतेत आणि वेगात लक्षणीय सुधारणा दिसून आली. अर्थात, रोहितचा हिटमॅन टू फिटमॅन बनण्याचा प्रवास हा मुळीच सोपा नव्हता. पण रोहितने त्यावर प्रचंड मेहनत घेतली आहे.
टार्गेट 2027 वनडे वर्ल्डकप
आयपीएल संपल्यानंतर रोहितने आपला एक फोटो पाहिला होता, ज्यामुळे त्याला स्वत:मध्ये बदल घडवण्याची इच्छा झाली. यानंतर त्याने फिटनेसवर फोकस करायचे ठरवले. मुळात त्याने 2027 वनडे वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. नेहमी फिटनेसमुळे ट्रोल होणाऱ्या रोहितने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आणि 11 किलो वजन कमी करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
रोहित आता फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळतो आहे. त्यामुळे, त्याच्यासमोर आव्हान आहे की तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्थानिक क्रिकेट खेळत राहतील का हे पाहणे देखील मनोरंजक असेल. जर दोन्ही दिग्गज स्थानिक क्रिकेट खेळले तर त्यांचा फॉर्म अबाधित राहील. दुसरीकडे वय जरी वाढले असले तरी रोहितने वजन कमी करत त्याने आपला फिटनेस उत्तम ठेवला आहे. आता, 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर त्याचा फोकस असणार, हे मात्र निश्चित आहे.









