वृत्तसंस्था / अॅस्टेना (कझाकस्थान)
2025 च्या कझाकस्थान विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची हितेश गुलीया आणि साक्षी यांनी आपल्या वजन गटातून उपांत्यफेरी गाठत भारताची आणखी दोन पदके निश्चित केली आहेत.
पुरुषांच्या 70 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हितेश गुलीयाने कझाकस्थानच्या अलमाझ ओरोझबेकोव्हचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकांत स्थान मिळविले. हितेशकडून आता भारताला आणखी एक पदक निश्चित झाले आहे. महिलांच्या 54 किलो वजन गटात भारताच्या साक्षीने ब्राझीलच्या तातीयाना चेगासचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत बुधवारी भारताच्या मिनाक्षीने 48 किलो वजन गटात, पूजा राणीने 80 किलो वजन गटात, संजूने 60 किलो वजन गटात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवित भारताची पदके निश्चित केली होती. 51 किलो गटात भारताच्या अनामिकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारताच्या जस्मिनने महिलांच्या 57 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना अझर बेजानच्या मिकाईलोव्हाचा पराभव केला. गेल्या एप्रिल महिन्यात ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी करताना एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्यपदके मिळविली होती. हितेशने ब्राझीलमधील स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.









