सच्चा शाहू विचारक, इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने साधे दालन उभारण्याकडे प्रशासनाची चालढकल : कोल्हापूरकरातून नाराजीचा सूर
संजीव खाडे कोल्हापूर
ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अशा असंख्य जबाबदाऱ्या पार पाडत अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. अप्पासाहेब पवार यांना शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीचे शिल्पकार आणि सच्चा शाहू अभ्यासक म्हटले जाते. शिवाजी विद्यापीठाला अंर्तबाह्या सजविणाऱ्या डॉ. पवार मात्र शिवाजी विद्यापीठात दुर्लक्षित राहिले आहे. त्यांच्या नावाने अभ्यासकांसाठी एक दालन उभारण्यात यावे, या मागणीकडे आजवर विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आज डॉ. पवार यांची 117 वी जयंती आहे. या निमित्ताने अनेक इतिहास अभ्यासकांबरोबर आजी माजी विद्यार्थी आणि कोल्हापूरकर यांच्याकडून दालन कधी उभारणार? असा प्रश्न उपस्थित करत यामागे असलेल्या झारीतील शुक्रचार्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे.
इतिहास, अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या डॉ. अप्पासाहेब पवार यांनी शिक्षण क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. इतिहास संशोधक म्हणून त्यांनी दिलेले योगदान बहुमूल्य ठरले. 1962 मध्ये त्यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरूपद चालून आले. फोंड्या माळावर त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या रूपाने विद्येचे नंदनवन उभारले, फुलवले. तब्बल 13 वर्षे विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविणाऱ्या डॉ. पवार यांच्यापुढे विद्यापीठाच्या उभारणीबरोबरच शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचे, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात उभे करण्याचे आव्हान होते. त्यांनी आपल्या कल्पक, कुशाग्र. कृतीशिल बुद्धीमत्तेचा वापर करत सर्व आव्हाने पेलली. आज शिवाजी विद्यापीठाचा लौकिक आहे, त्याची पायाभरणी डॉ. पवार यांनी केली. विविध विद्याशाखा सुरू करताना, त्याला आधुनिकतेची जोड दिली. कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून त्यांनी
गोर, गरीब घरातील विद्यार्थ्यांना भविष्यातील जगण्याची उमेद दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून तेरा वर्षे काम करताना त्यांनी इतिहास संशोधक, अभ्यासक म्हणून मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्मीळ व महत्वाची कागदपत्रे संपादीत करून त्यांचे खंड प्रकाशनही केले. करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांच्या काळातील दुर्मिळ कागदपत्रे मिळवून त्यांनी त्यावरील खंडही प्रकाशित केले.
राजर्षी शाहू संशोधन केंद्र उभारणीची तळमळ
डॉ. पवार यांच्यावर लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा प्रभाव होता. त्याचा वापर त्यांनी कुलगुरूपदावर असताना ग्रामीण, गोरगरीब विद्यार्थ्यांचा ज्ञानप्रवास सुकर होण्यासाठी केला. त्याचबरोबर शाहू महाराजांवरील कागदपत्रांचा खंड, त्यांचे विविध विषयावरील अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित केले. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठात शाहू संशोधन केंद्र असले पाहिजे, त्या माध्यमातून नव्या पिढीतील संशोधक तयार व्हावेत, अशी डॉ. पवार यांची तळमळ होती. 1974 मध्ये त्यांनी शाहू संशोधन केंद्राची उभारणी केली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन केले. या संशोधन पेंद्राच्या माध्यमातून आजवर असंख्य इतिहास संशोधक तयार झाले आहे. शाहू महाराजांच्या विषयीची अप्रकाशित, कागदपत्रे, लेख, ग्रंथ, पुस्तके या संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रकाशात आली आहेत. त्याचबरोबर नव्या पिढीतील इतिहास संशोधकही पुढे येत आहे. आज शाहू महाराजावरील संपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज, साहित्य प्रसिद्ध झाले आहे, त्यामागे संशोधन केंद्राची प्रेरणा आहे.
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष
शिव आणि शाहू कार्य करणाऱ्या डॉ. पवार यांच्या नावाने शाहू संशोधन केंद्रात एक दालन असावे, या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या शिल्पकाराची माहिती समाजाला, अभ्यासकांना मिळण्यास मदत होईल, या भावनेतून कोल्हापूरकर, आजी माजी विद्यार्थी मागणी करत आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक गेली दहा पंधरा वर्षे पाठपुरावा करत आहेत. पण त्याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दालन होऊ नये, यासाठी झारीतील शुक्रचार्य कायम प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांना रोखून विद्यापीठाने शाहू स्मृती शताब्दी वर्षाच्या समारोप प्रसंगी तरी डॉ. पवार यांना मरणोत्तर न्याय द्यावा. त्यासाठी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पुढाकार घ्यावा, कारण ते देखील शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनाही डॉ. पवार यांच्या योगदानाची कल्पना आहे.
तीन दशकांनंतरही दुर्लक्ष
डॉ. आप्पासाहेब पवार यांचा जन्म 5 मे 1906 रोजी झाला. त्यांचे निधन 30 डिसेंबर 1981 रोजी पुण्यात झाले. 1962 पासून 13 वर्षे ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. शाहू संशोधन केंद्राची स्थापना त्यांनी 1 डिसेंबर 1974 रोजी केली. आज त्यांच्या निधनाला 32 वर्षे झाली. तरीही त्यांच्या नावाने साधे दालन होत नाही, अशी खंत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली.